मुंबई : गणरायाच्या आगमनापूर्वी मुंबईतील सर्व रस्ते खड्डेमुक्त झाले पाहिजेत. गणेशोत्सवादरम्यान नागरिकांना रस्त्यासंबंधित कोणत्याही समस्येचा सामना करावा लागू नये. नागरिक, वाहनचालकांचा प्रवास सुखकर, विनाव्यत्यय होईल, यादृष्टीने येत्या दहा दिवसांत युद्धपातळीवर कामे करून सर्व रस्त्यांची दुरूस्ती पूर्ण करावी, असे स्पष्ट आदेश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले. मास्टिक पद्धतीने रस्ते दुरूस्ती करण्याचे परिणाम चांगले आढळत आहेत. त्यामुळे मास्टिकचा वापर करूनच रस्त्यांची दुरूस्ती करावी, असेही त्यांनी सांगितले. गणेश आगमन आणि विसर्जनापूर्वी रस्त्यांवर खड्डे पडल्यास तत्काळ बुजविण्याची कार्यवाही युद्धपातळीवर करावी, दुरूस्तीयोग्य रस्त्यांची डागडुजी करावी, अशा सूचना महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी संबंधित यंत्रणांना केल्या आहेत. या सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, यासाठी अभिजीत बांगर यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिका मुख्यालयात रस्ते विभागातील अभियंत्यांची बैठक पार पडली. येत्या ७ सप्टेंबर रोजी गणेशाचे आगमन होत आहे. सार्वजनिक मंडळांबरोबरच घरोघरी मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. उत्सवादरम्यान मुंबईकरांना कोणत्याही गैरसोयींचा सामना करावा लागू नये याची खबरदारी महानगरपालिका प्रशासनाकडून बाळगली जात आहे, असे बांगर यांनी सांगितले. महानगरपालिकेच्या रस्ते आणि वाहतूक विभागामार्फत खड्डेमुक्त रस्त्यांसाठी पालिकेच्या प्रभागात प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण २२७ दुय्यम अभियंत्याची नेमणूक करण्यात आली आहे. दुय्यम अभियंता नेमून दिलेल्या विभागात दररोज रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी करून खड्डे आढळल्यास ते मास्टिक पद्धतीने तात्काळ बुजवत आहेत. आता दुय्यम अभियंत्यांच्या बरोबरीने सहायक अभियंता, कार्यकारी अभियंता आणि उप प्रमुख अभियंता यांनी प्रत्यक्ष कार्यस्थळावर सक्रियपणे रस्त्यांची पाहणी करावी. असेही त्यांनी सांगितले.
सर्व विभागातील मास्टिक कुकर सुस्थितीत, तसेच वापरासाठी उपलब्ध असावेत, याची खातरजमा विभागीय पातळीवर करावी. सर्व संबंधित कंत्राटदारांना सूचना करून मास्टिकचे उत्पादन व उपलब्धतता, आवश्यक तेव्हा व आवश्यक त्या प्रमाणात पुरवठा होईल, यासाठी विशेष लक्ष द्यावे. जर कमी कालावधीत अधिक पुरवठा आवश्यक असेल तर तो उपलब्ध होईल, अशा पद्धतीने यंत्रणा सक्षम करावी. खड्डे बुजवण्याची कामे करताना विविध विभागांनी परस्परांमध्ये समन्वय साधून नियोजन करावे, असेही आदेश बांगर यांनी यंत्रणांना दिले.