ठाणे : सणासुदीच्या दिवसांत रेल्वे तिकिटांची मागणी वाढते. गर्दीच्या दिवसांत बसून प्रवास करण्यासाठी आरक्षित तिकिटांसाठी हवी ती रक्कम मोजण्यास प्रवासी तयार असतात. प्रवाशांच्या गरजेचा गैरफायदा घेऊन तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या आरोपी सलीम अहमद याला रेल्वे सुरक्षा दलाने बेड्या ठोकल्या. मुंब्रा-कौसामध्ये धाड टाकून आरपीएफने ही कारवाई केली.
ठाण्यातील मुंब्रा विभागात नेक्सस सॉफ्टवेअरचा वापर करून तिकिटांचा काळाबाजार होत असल्याची माहिती रेल्वे सुरक्षा दलालाला मिळाली. माहितीच्या आधारे आरपीएफने कौसामधील रशीद कम्पाऊंडमध्ये छापा टाकला. यावेळी आरोपी सलीम अहमदला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. आरोपीच्या घरातून एक कम्प्युटर आणि एक मोबाइल जप्त करण्यात आला आहे, असे वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. कम्प्युटरची तपासणी करण्यात आली असता १८ वैयक्तिक आयडी आढळून आले. हे सगळे आयडी ब्लॉक करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मोबाईल आणि कम्प्युटरमध्ये ७७६२ रुपयांची चालू तिकिटे आणि वापरलेली ७३२२ रुपये किंमतीची तिकिटे जप्त करण्यात आली.
कारवाईत जप्त करण्यात आलेली तिकिटे रद्द करण्यात येणार आहेत. यामुळे अनधिकृत दलालांकडून तिकीट खरेदी करणाऱ्या प्रवाशांना प्रवास करता येणार नाही. त्याचबरोबर तिकिटांचा परतावा देखील मिळणार नाही. सध्या गणेशोत्सव सुरू आहे. महिनाभरात नवरात्रीचा उत्सव साजरा होणार आहे. यामुळे उत्सव काळात प्रवाशांची अडवणूक करून अनधिकृत दलालांची तसेच तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्यांची धडपकड सुरूच असणार आहे.