वृत्तसंस्था : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाने शानदार कामगिरी करत इतिहास रचला आहे. टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात १९ धावांनी विजय मिळवत सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. भारत आणि श्रीलंकेच्या महिला संघात हा सामना खेळवला जात होता. सामना शेवटच्या षटकापर्यंत अटीतटीचा झाला. त्यांना शेवटच्या ५ षटकात ४३ धावांची आवश्यकता होती. पण भारतीय संघाच्या गोलंदाजांनी दमदार गोलंदाजी करत श्रीलंकेच्या संघावर कायम दबाव ठेवला. या सामन्याची नाणेफेक भारतीय संघाने जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघ बॉल टू बॉल फलंदाजी करत होते पण संधी मिळताच मोठे शॉटही लगावत त्यांनी ७ बाद ११७ धावसंख्या उभारली. भारताकडून स्मृती मानधना आणि शफाली वर्मा प्रथम सलामीसाठी आले. शफाली वर्मा अवघ्या ९ धावा करून बाद झाली पण स्मृती आणि जेमिमाहने भारताचा डाव चांगलाच सांभाळला. स्मृती मानधनाने ४५ चेंडूत ४६ धावा केल्या तर जेमिमाहने ४० चेंडूत ४२ धावा केल्या. त्यानंतर रिचा घोषने शानदार षटकार मारत ९ धावांची भर घातली. त्याशिवाय भारताच्या इतर फलंदाजांना दुहेरी आकडा गाठला आला नाही. तर श्रीलंकेकडून प्रबोधिनी, सुगंधिका कुमारी आणि रणवीरा यांनी प्रत्येकी २-२ विकेट घेतले.
श्रीलंकेची दुसऱ्या डावाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. त्यांनी दुसऱ्याच षटकात झटपट २ विकेट्स गमावले. तर चौथ्या षटकात चमारी अथापथुच्या रूपात महत्त्वाची विकेट मिळाली. या तिन्ही विकेट गेल्या सामन्यात पदार्पण केलेल्या तितास साधूने मिळवल्या आहेत. तर पूजा वस्त्राकार, दीप्ती शर्मा, देविका वैद्य यांनी प्रत्येकी १-१ विकेट घेतल्या. राजेश्वरी गायकवाड हीने आपल्या अनुभवाच्या आधारावर २ विकेटस मिळवल्या. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या महिला क्रिकेट स्पर्धेत भारताने सुवर्णपदक जिंकले तर श्रीलंकेने रौप्य पदक जिंकले. बांगलादेशने पाकिस्तानला हरवून कांस्यपदक जिंकले.