मुंबई : पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात आणखी एक एसी लोकल दाखल होणार आहे. तर, मध्य रेल्वेला एक सामान्य लोकल मिळाली आहे. चार वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पश्चिम आणि मध्य या दोन्ही मार्गांसाठी नवीन उपनगरीय ट्रेन मिळाल्या आहेत. या दोन लोकलमुळं नागरिकांचा प्रवास सुकर होणार आहे. विरार यार्डात नवीन एसी लोकल दाखल झाली आहे. आठवडाभर या लोकलची टेस्टिंग होणार आहे. त्यानंतर ही लोकल प्रवासी सेवेत दाखल होणार आहे. या नव्या लोकलमुळं पश्चिम रेल्वेच्या १० ते १२ एसी सेवांमध्ये वाढ होणार आहे. मात्र ही गाडी जलद किंवा धिम्या मार्गावर चालवण्याचा निर्णय अद्याप झाला नाहीये. सध्या पश्चिम रेल्वेवर लोकलच्या एकूण १४०६ फेऱ्या धावतात. मात्र यात आणखी वाढ झाल्यास प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
पश्चिम रेल्वेबरोबरच मध्य रेल्वेवरही एक लोकल मिळाली आहे. मध्य रेल्वेला सामान्य लोकल मिळाली आहे. चौथा कॉरिडॉर असलेल्या बेलापूर-उरण मार्गिकेवर सुरू असलेल्या जुन्या लोकलच्या जागेवर धावणार आहे. १२ डब्यांची ही लोकल आहे. सध्या बेलापूर-उरण विभागात तीन रेट्रोफिटेड लोकल गाड्यांचा वापर केला जातो. या तीन लोकलपैकी एक गाडी बदलून त्या जागी नवी लोकल चालवली जाणार आहे. मध्य रेल्वेवरील रुळांवर होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने विशेष मोहिमा राबवूनही या मृत्यूंमध्ये अपेक्षित घट झालेली नाही. जानेवारी ते ऑक्टोबर अशा दहा महिन्यांत मध्य रेल्वेने एकूण २३८८ मृत्यूची प्रकरणे नोंदवली आहे. त्यातील १२१० प्रकरणं ट्रेसपासिंगची असल्याचे स्पष्ट झाले आहे. ट्रेसपासिंग मृत्यूचे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा जास्त नोंद झाल्याने रेल्वेच्या याबाबतच्या उपाययोजना अपुऱ्या पडत असल्याचे मत तज्ञ व्यक्त केले आहे.रेल्वे रुळावर जाणाऱ्यांना रोखण्यासाठी पादचारी उड्डाण पूल, भुयारी मार्ग आणि सरकते जिने उभारून प्रवाशांना पर्याय उपलब्ध करून दिले आहेत.