नवी दिल्ली : शिक्षक दिनाचे औचित्य साधून विज्ञान भवन येथे आयोजित राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६ सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते महाराष्ट्रातील ९ गुणवंत शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, उच्च शिक्षण विभाग आणि कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळ्यात देशभरातील एकूण ८२ शिक्षकांचा गौरव करण्यात आला. यामध्ये ४८ शालेय शिक्षक, २१ उच्च शिक्षण क्षेत्रातील प्राध्यापक आणि १३ कौशल्य विकास क्षेत्रातील शिक्षकांचा समावेश होता. प्रत्येक पुरस्कारार्थीला प्रमाणपत्र, पदक आणि ५० हजार रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले. यावेळी केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी, शिक्षण राज्यमंत्री डॉ. सुकांत मजूमदार, कौशल्य विकास राज्यमंत्री जयंत चौधरी तसेच शिक्षण मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शिक्षकांचे समाज आणि राष्ट्रनिर्मितीतील योगदान अधोरेखित करत, शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला, चारित्र्याला आणि विचारांना दिशा देणारे खरे शिल्पकार असल्याचे सांगितले. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, रवींद्रनाथ टागोर आणि गोपाळबंधू दास यांच्या कार्याचा उल्लेख करत त्यांनी दुर्गम आणि ग्रामीण भागात कार्यरत शिक्षकांच्या समर्पणाचे विशेष कौतुक केले. भारताला ज्ञान आणि कौशल्याची जागतिक राजधानी बनवण्यासाठी प्राथमिक स्तरापासून तंत्रज्ञान, नैतिक मूल्ये आणि कौशल्याधारित शिक्षणाला प्राधान्य देण्याचे आवाहनही त्यांनी केले.
महाराष्ट्रातील पुरस्कारप्राप्त शिक्षकांनी शिक्षण क्षेत्रात विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी उल्लेखनीय कार्य केले आहे. बीडच्या डॉ. कविता गिट्टे यांनी ऊसतोड कामगारांच्या मुलांना शिक्षणाशी जोडण्यासाठी ‘पालक रक्षक’ आणि ‘शिक्षण आपल्या दारी’सारखे उपक्रम राबवले. नाशिकच्या कुंदा बच्छाव यांनी महापालिका शाळांमध्ये डिजिटल शिक्षण, यंत्रमानव तंत्रज्ञान आणि आधुनिक अध्यापन पद्धतींचा प्रभावी वापर केला. लातूरच्या वैभव कुलकर्णी यांनी खेळणी आणि कलांच्या माध्यमातून गणित शिकवण्याची अभिनव पद्धत विकसित केली, तर साताऱ्याच्या शिवप्रसाद टिंगरे यांनी विज्ञान शिक्षणासाठी कमी खर्चातील प्रयोगसाधने आणि डिजिटल अध्यापनाचा वापर करून विद्यार्थ्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवून दिले. उच्च शिक्षण क्षेत्रात आयआयटी मुंबईचे डॉ. विक्रम विशाल यांनी कार्बन पकड व साठवणूक विषयावर महत्त्वपूर्ण संशोधन केले. वर्ध्याचे डॉ. अमर ताकसांडे यांनी वैद्यकीय शिक्षण आणि ग्रामीण बालआरोग्य क्षेत्रात मोलाचे योगदान दिले, तर सोलापूरच्या डॉ. संदीपान नरोटे यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आधुनिक तंत्रज्ञानाधारित शिक्षणाला चालना दिली. कौशल्य विकास क्षेत्रात धाराशिवचे किरण झारकर यांनी औद्योगिक प्रशिक्षण अधिक प्रभावी बनवले, तर नाशिकच्या अर्चना जाधव यांनी आदिवासी आणि ग्रामीण युवतींना वस्त्ररचना व शिवणकलेचे प्रशिक्षण देत त्यांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. या सर्व शिक्षकांनी आपल्या कार्यातून गुणवत्तापूर्ण शिक्षण, संशोधन, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि कौशल्य विकासाला नवी दिशा देत महाराष्ट्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव वाढवला.






