नवी दिल्ली : जंतर-मंतर येथील विद्यार्थी आंदोलनादरम्यान निशू आझाद या तरुणीचे वडील संजय कुमार यांच्यावर झालेल्या कथित हल्ल्याच्या निषेधार्थ कॉक्रोच जनता पार्टी (सीजेपी)ने पुन्हा एकदा दिल्लीत आक्रमक भूमिका घेतली आहे. पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्याबाहेर पक्षाने मोठे आंदोलन छेडत आरोपी स्वतंत्र भारद्वाज याच्यावर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सीजेपीचे नेते सौरभ दास, आशुतोष रांका तसेच इतर कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले असून, निशू आणि तिच्या कुटुंबाला न्याय मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. पक्षाच्या म्हणण्यानुसार, हल्ल्याप्रकरणी पुरेशी माहिती आणि तक्रार असूनही दिल्ली पोलिसांनी आरोपीविरोधात कोणतीही प्रभावी कारवाई केलेली नाही. त्यामुळे पोलिसांवर राजकीय दबावाखाली काम केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या प्रकरणाने पुन्हा एकदा विद्यार्थी आंदोलन, कायदा-सुव्यवस्था आणि राजकीय हस्तक्षेप या मुद्द्यांवर चर्चा सुरू झाली आहे. आंदोलनादरम्यान निशूने सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसिद्ध करून मदतीचे आवाहन केले होते. त्यानंतर राहुल गांधी यांनी तिला पाठिंबा देत न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर सीजेपीने हा मुद्दा अधिक आक्रमकपणे उचलत दिल्लीतील आंदोलनाची तीव्रता वाढवली आहे. निशू, तिचे वडील संजय कुमार, सौरभ दास, चंद्रशेखर आझाद आणि आशुतोष रांका यांनी डीसीपी कार्यालयात जाऊन पुन्हा निवेदन सादर केले. या प्रकरणात स्वतंत्र भारद्वाजने एका पॉडकास्टमध्ये हल्ल्याची कबुली दिल्याचा दावा करण्यात आला असून, राजकीय संबंधांमुळे त्याच्यावर कारवाई झाली नसल्याचा आरोपही सीजेपीकडून करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणाने राजकीय वर्तुळातही मोठी खळबळ उडाली असून, विरोधकांनी सरकार आणि दिल्ली पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया देत केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांवर निशाणा साधला. त्यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये निशूला धीर देत, “तू एकटी नाहीस, आम्ही तुझ्यासोबत आहोत,” असे सांगितले. विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी आवाज उठवल्यामुळेच निशू आणि तिच्या कुटुंबाला लक्ष्य करण्यात आल्याचा आरोप करत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना थेट प्रश्न विचारले. एका दलित विद्यार्थिनीच्या वडिलांवर हल्ला करणारा आरोपी मोकाट फिरत असताना त्याचे संरक्षण का केले जात आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. “जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत आमचा लढा सुरू राहील,” असे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे, सीजेपीचे नेते आशुतोष रांका यांनी दिल्ली पोलिसांवर भाजपच्या दबावाखाली काम करत असल्याचा गंभीर आरोप करत तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. या सर्व घडामोडींनंतर आरोपी स्वतंत्र भारद्वाजनेही स्पष्टीकरण देत पॉडकास्टमधील वक्तव्याचा विपर्यास झाल्याचा दावा केला. त्याच्या म्हणण्यानुसार, संजय कुमार यांच्याशी झालेली झटापट ही आत्मसंरक्षणासाठी होती आणि त्याने कोणताही हेतुपुरस्सर हल्ला केलेला नाही. मात्र, या स्पष्टीकरणानंतरही वाद शमलेला नसून, राजकीय आरोप-प्रत्यारोप अधिक तीव्र झाले आहेत. विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेला हा वाद आता राष्ट्रीय पातळीवरील राजकीय संघर्षात परिवर्तित झाला असून, आगामी काळात दिल्ली पोलिसांची भूमिका आणि तपासाची दिशा याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





