नागपूर : पुण्यात गणेशोत्सवात डीजेच्या वापरावरून वाद सुरू असतानाच नागपूर पोलिसांनी आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतला आहे. ध्वनीप्रदूषण, लेझर आणि बीम लाईटमुळे नागरिकांच्या आरोग्याला होणारा धोका तसेच कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेऊन शहरात ४ सप्टेंबर ते १ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत डीजे, बीम लाईट आणि लेझर लाईटच्या वापरावर कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी याबाबत प्रतिबंधात्मक आदेश जारी केला असून सार्वजनिक तसेच खासगी कार्यक्रमांमध्ये डीजे साऊंड सिस्टीम वाहून नेणारी वाहने, लेझर बीम आणि तीव्र प्रकाशयंत्रणांच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर थेट कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे. या काळात नागपूरमध्ये गोकुळाष्टमी, दहीहंडी, पोळा, तान्हा पोळा, ताजुद्दीन बाबा छब्बीसवी, गणेशोत्सव, गणेश आगमन-विसर्जन मिरवणुका तसेच धम्मचक्र प्रवर्तन दिनासह अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार असल्याने गर्दीच्या ठिकाणी सुरक्षितता राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
प्रशासनाच्या मते, मिरवणुकांमध्ये वापरल्या जाणाऱ्या तीव्र लेझर आणि बीम लाईटमुळे नागरिकांच्या डोळ्यांना इजा होण्याची शक्यता असते. विशेषतः वाहनचालकांच्या डोळ्यांवर थेट प्रकाश पडल्यास अपघात होण्याचा धोका वाढू शकतो. त्याचबरोबर डीजेच्या प्रचंड आवाजामुळे ध्वनीप्रदूषण वाढून ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, आजारी व्यक्ती आणि रुग्णालय परिसरातील रुग्णांना गंभीर त्रास सहन करावा लागू शकतो. त्यामुळे उत्सवाचा आनंद कायम ठेवतानाच नागरिकांचे आरोग्य, सुरक्षितता आणि सार्वजनिक शांतता अबाधित राखण्यावर नागपूर पोलिसांनी भर दिला आहे. गणेशोत्सव मंडळे, मिरवणूक आयोजक आणि खासगी कार्यक्रम आयोजकांनी नियमांचे काटेकोर पालन करावे, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. पुण्यात डीजेच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या सामाजिक आणि राजकीय चर्चेच्या पार्श्वभूमीवर नागपूर पोलिसांनी घेतलेला हा निर्णय राज्यभर चर्चेचा विषय ठरला असून, आगामी सण-उत्सव शांततापूर्ण, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक वातावरणात पार पाडण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट झाले आहे.






