पुणे : प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ आणि वेळेची बचत करणारा व्हावा या उद्देशाने महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनाने (महामेट्रो) तीन महत्त्वाच्या स्थानकांवरील नवीन प्रवेशद्वारे शनिवारपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये स्वारगेट मेट्रो स्थानक ते स्वारगेट एसटी स्थानक जोडणारा भुयारी मार्ग सुरू केला जाणार आहे. त्यामुळे या ठिकाणाहून प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. या सुविधेमुळे प्रवाशांना वाहतुकीतून वाट काढत रस्ते ओलांडण्याची गरज कमी होऊन सुरक्षिततेत वाढ होणार आहे. शिवाय वेळ व श्रमाचीही बचत होणार आहे.
स्वारगेट चौकातून जीव मुठीत धरून भरधाव वाहनांमधून वाट काढत रस्ता ओलांडावा लागत होता. हे काम लवकर करावे, अशी मागणीदेखील केली जात होती. अखेर हे काम पूर्ण होऊन त्याला मेट्रो रेल सुरक्षा आयुक्तांनी परवानगी दिली आहे. स्वारगेट मेट्रो स्थानक येथील प्रवेशद्वार क्रमांक पाच एसटी स्थानकाच्या बाजूला भुयारी मार्गाने उघडण्यात येणार आहे. एसटी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना थेट मेट्रोमध्ये प्रवेश मिळणार आहे. त्यामुळे स्वारगेट परिसरातील वाहतूक कोंडी टाळण्यास मदत होणार आहे. शिवाजीनगर मेट्रोस्थानक येथील प्रवेशद्वार क्रमांक तीन आकाशवाणी केंद्राजवळील भाऊसाहेब खुडे चौकात (सिमला ऑफिस) भुयारी मार्गाने सुरू होत आहे. गणेशखिंड रस्ता व कृषी महाविद्यालयाच्या बाजूने येणाऱ्या प्रवाशांना थेट स्थानकात पोहोचणे अधिक सोयीचे होणार आहे. या प्रवेशद्वारामुळे मुख्य रस्त्यासोबत मेट्रो स्थानक जोडले जाणार आहे; तसेच पिंपरी-चिंचवड महापालिका मेट्रोस्थानकावरील प्रवेशद्वार क्रमांक तीन पुणे-मुंबई महामार्गावर, पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर उघडण्यात येत आहे. त्यामुळे शहरातून स्थानकात येणाऱ्या; तसेच बाहेर जाणाऱ्या प्रवाशांना रस्ता ओलांडण्याची आवश्यकता राहणार नाही. मेट्रोची वाढती प्रवासीसंख्या लक्षात घेऊन ही प्रवेशद्वारे सुरू करण्यात येत आहेत. विशेषतः मुख्य रस्त्यांवरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना या सुविधेचा मोठा लाभ होईल.







