माथेरान : पावसाळ्यातील धुक्याचा आणि निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या संख्येने पर्यटक माथेरानला भेट देत आहेत. विशेषतः शनिवार आणि रविवारी हजारो पर्यटक माथेरानमध्ये दाखल होत असल्याने परिसरात मोठी गर्दी होत आहे. मात्र, यंदा रविवारी (२ ऑगस्ट) आयोजित करण्यात आलेल्या माथेरान हिल मॅरेथॉन स्पर्धेमुळे नेरळ–माथेरान घाटरस्त्यावर पहाटे ५ ते सकाळी ८.३० वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे माथेरानकडे जाणाऱ्या पर्यटकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागू शकतो. घाटरस्ता बंद असल्याने नेरळ रेल्वे स्थानक परिसर, टॅक्सी स्टँड आणि प्रवेशद्वारांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पर्यटकांनी या काळात प्रवासाचे योग्य नियोजन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. माथेरान हे समुद्रसपाटीपासून सुमारे ८०० मीटर उंचीवर वसलेले थंड हवेचे ठिकाण असून येथे विविध क्रीडा आणि साहसी स्पर्धांचे आयोजन केले जाते. त्याचाच एक भाग म्हणून यंदा दुसऱ्या वर्षी माथेरान हिल मॅरेथॉन आयोजित करण्यात आली आहे. २१.१ किलोमीटर आणि १५ किलोमीटर अशा दोन गटांमध्ये ही स्पर्धा होणार असून देशभरातून सुमारे ४०० धावपटू सहभागी होणार आहेत. यंदा स्पर्धेचा मार्ग बदलण्यात आला असून कल्याण–नेरळ–कर्जत मार्गावरील सीमा रिसॉर्ट परिसरातून स्पर्धेला सुरुवात होणार आहे.
पहाटे ५ वाजता सुरू होणाऱ्या या स्पर्धेत सहभागी धावपटू सीमा रिसॉर्टवरून कर्जतकडे धावत माणगाव फाटा, त्यानंतर नेरळमार्गे हुतात्मा चौकातून माथेरान घाट चढून जुम्मापट्टी आणि दस्तुरी नाका येथे पोहोचतील. २१.१ किलोमीटर गटातील स्पर्धक तेथून पुन्हा घाट उतरून प्रारंभस्थळी परततील, तर १५ किलोमीटर गटातील धावपटू जुम्मापट्टी येथून परतीचा प्रवास करून सीमा रिसॉर्ट येथे स्पर्धा पूर्ण करतील. या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर रायगड पोलीस आणि वाहतूक विभागाने नेरळ–माथेरान घाटरस्ता सकाळी साडेतीन तास पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात टॅक्सी सेवाही बंद राहणार असल्याने नेरळ रेल्वे स्थानकावर आणि परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रविवारी सकाळच्या वेळेत माथेरानला जाण्याचा विचार करणाऱ्या पर्यटकांनी वाहतूक बंदीची वेळ लक्षात घेऊन प्रवासाचे नियोजन करावे, तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून अनावश्यक गैरसोय टाळावी, असे आवाहन करण्यात आले आहे.





