मुंबई : कोरोना काळात १२ हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा ठपका कॅगने ठेवला आहे. ईडीही त्या खर्चाची चौकशी करीत आहे. कोरोना काळातील संपूर्ण खर्चाची लेखाजोखा तयार करण्याच्या कामाला पालिकेचे अधिकारी लागले असल्याचे समजते. पालिकेच्या चोवीस विभाग कार्यालयांतील अधिकारी या कामाला जुंपले असल्याचे समजते. कॅगच्या तपासात १२ हजार कोटी ३ हजार ५०० कोटीहून अधिक खर्च कोविड व्यवस्थापनाशी संबंधित आहे. यात १३ जम्बो कोविड सेंटर, २४ वॉर्ड कार्यालये, पाच मोठी रुग्णालये, १६ सर्वसाधारण रुग्णालये यांचा समावेश आहे. कोविड काळात वारेमाप खर्च केला आहे. त्याचा हिशेब लागत नाही असा ताशेरे कॅगने मारले होते.
आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय शिवसेनेचे पदाधिकारी सूरज चव्हाण यांचे चेंबूर येथील निवासस्थान आणि खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्या सांताक्रूझ येथील निवासस्थानी ईडीने छापे टाकले. तसेच कोरोना काळात मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त असलेल्या सनदी अधिकारी संजीव जयस्वाल यांनाही ईडी चौकशी सुरू आहे. खरेदी केलेल्या प्रत्येक साहित्यांच्या कार्यादेशासह झालेल्या खर्चाचा अहवाल आपल्या स्वाक्षरीसह तयार करण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच सर्व अधिकाऱ्यांना जमा खर्चाचा लेखाजोखा तयार करण्याच्या कामाला लागले आहेत. तपास यंत्रणांना देण्यासाठी ते तयार करायचे असल्याने त्यात काही उणीवा राहिल्यास चौकशीला सामोरे जाण्याच्या भितीने अधिका-याचे धाबे दणाणले आहे.
खरेदी प्रक्रियेमध्ये सहभागी असलेल्या सर्व रुग्णालय आणि कोविड सेंटरचे अधिष्ठाता, वैद्यकीय अधिकारी, मध्यवर्ती खरेदी खाते आणि २४ विभागांचे सहायक आयुक्त हे खर्चाचा लेखाजोखा तयार करीत असल्याचे समजते. तपास यंत्रणांच्या अधिका-याना पूर्ण सहकार्य देण्याचे आदेश पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी दिल्या आहेत.