पनवेल : पनवेल महानगरपालिका खारघर शहरात ट्रॅफिक पार्क उभारणार आहे.याकरिता साधारणतः १६ कोटींचा खर्च येणार असून नऊ हजार स्केअर मीटर जागेत उभारल्या जाणाऱ्या या पार्क मध्ये शालेय विद्यार्थ्यांना वाहतुकीची माहिती व्हावी, सिग्नल यंत्रणा समजावी आदींसह वाहतुकीचे नियम त्यांना बालपणापासून अंगवळणी पडावेत या उद्देशाने माहिती तसेच प्रात्यक्षिके पहावयास मिळणार आहेत. खारघर सेक्टर ३ एफ,प्लॉट नंबर ९ ए याठिकाणी हे पार्क विकसित केले जाणार आहे.असीम गोवंश हरवंश हि कंपनी हि बाग विकसित करणार आहे. ठाणे महापालिकेने कासारवडवली येथील कावेसर भागात अशाप्रकारचे पार्क उभारले आहे. या ठिकाणी लहान मुलांसाठी वाहतुकीचे नियम, वाहतूक व्यवस्थापन या विषयीचे मार्गदर्शन दिले जाणार आहे. यासाठी एक क्लासरूमही सुरू केली आहे.
वाहन कसे चालावे याची माहितीदेखील दिली जाणार आहे. तसेच दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी सिम्युलेशन ब्लॉक तयार करणे, लहान मुलांसाठी सायकल,मोटार बाईक व कारसह, दुचाकी वाहनांसाठी अॅडल्ट ट्रेनिंग ट्रॅक, अॅम्पि थिएटर, आर्कषक गेट, लहान मुलांसाठी खेळाची जागा, लायसन्सकरिता रूम, कॅफेटेरिया, शौचालय, विविध स्कल्पचर्स, लॅन्डस्केपिंग आदी याठिकाणी उभारले जाणार आहे.शालेय विद्यार्थ्यांना पुस्तकात वाहतूक नियमांचे धडे देण्याऐवजी प्रत्यक्षात त्याची माहिती दिल्यास त्याचा प्रभाव विद्यार्थ्यांवर पडणार आहे.खारघर सारख्या निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या शहरात हे पार्क उभारले जात असल्याने पनवेल शिवाय,नवी मुंबई आणि संपूर्ण रायगड जिल्ह्यातील शाळांना याठिकाणी विद्यार्थ्यांच्या भेटी देता येणार आहेत.
विद्यार्थ्यांना केवळ वाहतूक नियमांच्या माहितीसाठी याठिकाणी स्वतंत्र असे वर्क शॉप आयोजित करता येणार आहेत.विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांबाबत साक्षर करण्याच्या दृष्टीने पनवेल महानगरपालिकेने हा प्रकल्प राबविण्याचे निश्चित केले असुन पुढील दीड वर्षात हा प्रकल्प मार्गी लागणार आहे.
बगीचे,उद्यान आदी करमणुकीची जागा नसुन शाळेत विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमांबाबत माहिती देणारे हे पार्क करमणुकीसह विद्यार्थ्यांना वाहतूक साक्षर करणार आहे.त्यादृष्टीने पालिकेच्या वतीने हा प्रकल्प उभारला जाणार आहे.पनवेलच नाही तर आजूबाजूच्या शाळेमधील विद्यार्थी याठिकाणी आवर्जुन भेट देतील. – डॉ वैभव विधाते (उपायुक्त,पनवेल महानगरपालिका )