मुंबई : जवळपास वर्षभरापासून बंद अवस्थेत असून ताडपत्रीने झाकण्यात आलेल्या दादरच्या ऐतिहासिक कबुतरखान्याचे सुशोभीकरण करण्यासाठी मुंबई महापालिकेने तयारी सुरू केली आहे. शहराच्या महत्त्वाच्या वारसा स्थळांपैकी एक असलेल्या या कबुतरखान्याचा मूळ ऐतिहासिक आणि वास्तुशिल्पीय स्वरूप कायम ठेवत परिसराचे सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत सध्या लावलेली अपारदर्शक ताडपत्री हटवून तिच्या जागी पारदर्शक ॲक्रेलिक शीट बसवण्यात येतील, ज्यामुळे वास्तूचे संरक्षण होण्यासोबतच तिचे मूळ स्वरूप नागरिकांना पाहता येईल. तसेच कबुतरखान्याभोवती हिरवळ विकसित केली जाणार असून, परिसर अधिक आकर्षक आणि स्वच्छ ठेवण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जाणार आहेत. या उपक्रमाचा मुख्य उद्देश ऐतिहासिक वास्तूची ओळख जपणे, परिसराचे सौंदर्य वाढवणे आणि सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना खाऊ घालण्यावरील बंदी कायम ठेवणे हा आहे. दादर रेल्वे स्थानकाजवळील वाहतूक बेटावर १९३३ मध्ये उभारण्यात आलेला हा कबुतरखाना मुंबईच्या महत्त्वाच्या वारसा वास्तूंमध्ये गणला जातो आणि त्याला ग्रेड-२ वारसा दर्जा प्राप्त आहे. कबुतरखान्याच्या मध्यभागी पाण्याचा झराही असून, अनेक दशकांपासून येथे नागरिक कबुतरांना खाऊ घालत आले आहेत. १९८० आणि १९९० च्या दशकात अनेक हिंदी चित्रपटांचे चित्रीकरणही या परिसरात झाले होते, त्यामुळे या वास्तूला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
सुशोभीकरण योजनेअंतर्गत कबुतरखान्यालगतच्या पदपथाचीही दुरुस्ती करण्यात येणार असून, पादचाऱ्यांसाठी अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर व्यवस्था उभारली जाणार आहे. सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना खाऊ घालण्यावरील बंदीमुळे धार्मिक भावना लक्षात घेऊन महापालिकेने आरे, गोरेगाव, वर्सोवा आणि वडाळा येथे पर्यायी ठिकाणे निश्चित केली होती. मात्र, या ठिकाणी अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. दरम्यान, सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना खाऊ घालण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने सीसीटीव्ही, बीट मार्शल आणि इतर निगराणी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये उच्च न्यायालयाने सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना खाद्य देण्यामुळे निर्माण होणारे आरोग्यविषयक धोके आणि फुफ्फुसांच्या आजारांचा संदर्भ देत अशा प्रकारच्या खाद्यवाटपावर बंदी घातली होती. त्यानंतर दादरसह मुंबईतील अनेक कबुतरखाने तात्पुरते बंद करून ताडपत्रीने झाकण्यात आले होते. सध्या मुंबईत अशा सुमारे ५१ कबुतरखान्यांची नोंद आहे. महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, दादर कबुतरखान्याच्या सुशोभीकरणाचा प्रस्ताव संबंधित प्रभाग समितीकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला असून, मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. या कामादरम्यान कबुतरखान्याच्या मूळ रचनेत कोणताही बदल केला जाणार नसून, वारसा जपत परिसराचे सुशोभीकरण आणि हिरवळ विकसित करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.






