मुंबई : राज्यातील महायुती सरकारच्या गेल्या साडेसात वर्षांच्या राजवटीत मुंबईचा चेहरा मोहरा बदलला असून कोणत्याही परिस्थितीत येत्या ७ वर्षात मुंबई झोपडपट्टीमुक्त करणार असून त्याचा कृती आराखडा( रोडमॅप) तयार करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे केली.
मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप शिवसेना(शिंदे) युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ कांदिवली येथील सभेत फडणवीस बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. मुंबईच्या माजी महापौर आणि ठाकरे गटाच्या नेत्या शुभा राऊळ यांनी यावेळी भाजपात प्रवेश केला. उपस्थितांना मार्गदर्शन करतांना फडणवीस यांनी शिवसेना(ठाकरे) आणि मनसेच्या युतीची कन्फ्युजन आणि करप्शन यांची युती अशी संभावना केली. मुंबईकरांचे, झोपडपट्टीवासीयांचे विविध प्रश्न प्रश्न मार्गी लावतानाच सरकारने सुरु केलेल्या अनेक योजना पूर्ण केल्याचे फडणवीस यांनी सांगितले. मुंबईतील प्रत्येक झोपडीवासीयाना हक्काचे पक्के घर देऊन येत्या सात वर्षात मुंबईत झोपडपट्टी मुक्त करण्याचा आराखडा तयार करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.







