मुंबई : मुंबईकरांसाठी दादर येथील श्री सिद्धिविनायक मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. नववर्षाच्या सुरुवातीलाच भाविकांनी सकाळी ५ वाजल्यापासून काकड आरतीसाठी मंदिरात रांगा लावल्या होत्या. त्यामुळे नववर्षाच्या पहिल्या काही दिवसांत सिद्धिविनायक मंदिरात मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. इतकेच नव्हे, तर मंगळवार हा गणपतीचा वार मानला जात असल्याने त्या दिवशीसुद्धा मुंबईतील भाविक मंदिरात दर्शनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात आणि रांगाच रांगा लागतात.
मात्र, आता पुढील काही दिवस सिद्धिविनायक मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंद राहणार आहे. त्यामुळे भाविकांनी याची नोंद घ्यावी आणि मंदिर कधीपर्यंत बंद राहणार आहे, याची माहिती जाणून घ्यावी. श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टने ७ जानेवारी ते १२ जानेवारी या कालावधीत सिद्धिविनायक मंदिराच्या गाभाऱ्यातील दर्शन बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. या काळात मंदिराचा गाभारा सलग पाच दिवस बंद राहणार असल्याचे अधिकृत निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. दादरमधील प्रतिष्ठित श्री सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी दररोज हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित राहतात. त्यामुळे श्रींच्या मूर्तीला सिंदूर लेपन करण्याच्या वार्षिक विधीसाठी दर्शन पाच दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. दुरून येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी ट्रस्टकडून ही अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. मुंबईतील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक असलेले हे श्री सिद्धिविनायक मंदिर मूळतः लक्ष्मण विठू आणि देऊबाई पाटील यांनी १९ नोव्हेंबर १८०९ रोजी बांधले होते. तेव्हापासून मुंबई शहरासह देश-विदेशातून भाविक मोठ्या श्रद्धेने सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे भाविकांनी मंदिर बंद असण्याबाबतची ही माहिती लक्षात घेणे आवश्यक आहे.







