नाशिक : नाशिकमध्ये कोट्यावधीचे ड्रग्स सापडल्यामुळे खळबळ माजली आहे. विद्यर्थी-पालकांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मुंबईचे पोलिस नाशिक मध्ये येऊन कारवाई करतात मग नाशिकचे पोलिस काय करतात, यावरून आमदार देवयानी फरांदे या आक्रमक झाल्या आहेत.
नाशिकचा उडता पंजाब झाला आहे, हे मी सभागृहात बोलतानाच सांगितले होते. पोलिसांना ६ महिन्यांपूर्वीच सगळ्या ड्रग डीलर्सचे नंबर दिले होते. नाशिकमध्ये ड्रग्सचा कारखाना सुरू आहे हे मी सभागृहात सांगितले होते. मग त्यावर कारवाई का नाही झाली, ड्रग्स हँडलरचा सिडीआर का तपासला नाही, असा संतप्त सवाल देवयानी फरांदे यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या.
पोलिसांना या प्रकरणाची संपूर्ण कल्पना दिली असतानाही पोलिसांनी कारवाई का केली नाही, याचे उत्तर द्यावे. नाशिकमध्ये पोलिसच ड्रगच्या अधीन आहेत हे मला देखील समजले आहे. त्यामुळे शाळा, महाविद्यालय, संपूर्ण शहरात ड्रग्सचा बाजार सुरू असताना पोलीस काहीच करत नाहीत, असा आरोपही त्यांनी केला. एमडी ड्रग्स तयार होणाऱ्या कारखान्यात पोलिसांनी धाड टाकली. यात शेकडो कोटींपेक्षा जास्त किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला, त्यामुळे फरांदे कमालीच्या आक्रमक झाल्या आहेत.