मुंबई : वडिलांच्या मानसिक आजाराच्या गोळ्या खाल्ल्यामुळे आजारी पडलेल्या पंधरा वर्षांच्या मुलीसोबत अश्लील चाळे करण्यात आल्याचा प्रकार जे. जे. रुग्णालयातील अतिदक्षता विभागात घडला आहे. याबाबत मुलीच्या आईने केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून सफाई कर्मचारी रोहिदास सोळंकी याला अटक केली आहे.
पंधरा वर्षांची ही मुलगी तिच्या पालकांसोबत मानखुर्द परिसरात वास्तव्यास होती. काही दिवसांपूर्वी त्यांनी हा परिसर सोडून वास्तव्याचे ठिकाण बदलले. मुलीला पुन्हा मानखुर्द येथे जायचे होते; मात्र पालकांनी त्यास नकार दिला. यामुळे रागावलेल्या मुलीने वडिलांच्या मानसिक आजारावरील गोळ्या खाल्या. यामुळे तिची प्रकृती बिघडली. गोळ्यांच्या अतिसेवनामुळे तिला जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती चिंताजनक असल्याने तिला अतिदक्षता विभागात हलविण्यात आले. रुग्णालय कर्मचाऱ्यांसह आईदेखील तिची देखभाल करीत होती.
अतिदक्षता विभागात रोहिदास सोळंकी हा साफसफाई करण्यासाठी गेला. मुलीची आई स्वच्छतागृहात गेल्याचे पाहून त्याने मुलीसोबत अश्लील चाळे केले. हा प्रकार मुलीने आईला सांगितल्यानंतर तिने जे. जे. मार्ग पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी विनयभंग आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून रोहिदास याला अटक केली.