मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक मुसंडी मारली असून, तब्बल २५ वर्षांनंतर ठाकरे कुटुंबाची मुंबईवरील पकड सुटताना दिसत आहे. निकालाचे कल स्पष्ट होत असताना सर्वांचे लक्ष ‘मुंबईचा नवा महापौर कोण?’ याकडे लागले आहे. मात्र, महापौरांची अधिकृत निवड होण्यासाठी मुंबईकरांना अजून काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या रात्री स्वित्झर्लंडमधील दावोस गुंतवणूक परिषदेसाठी रवाना होणार आहेत. मुख्यमंत्री २५ जानेवारीला भारतात परतणार असल्याने, महापौर निवडीची अधिकृत प्रक्रिया आणि त्याबाबतची राजकीय रणनीती २६ जानेवारीनंतरच पूर्ण होण्याची शक्यता आहे. मुंबईत महापौरांची निवड थेट जनतेतून होत नाही, तर ती एका कायदेशीर प्रक्रियेद्वारे पार पडते. महापालिका निवडणुकीत निवडून आलेले नगरसेवक आपापल्या पक्षाचा उमेदवार निश्चित करतात आणि मतदान करतात. तसेच, मुंबई महानगरपालिका आयुक्त महापौर निवडीची अधिकृत तारीख आणि प्रक्रिया जाहीर करतात. महापौरपदाची श्रेणी (खुला प्रवर्ग, महिला, ओबीसी किंवा एससी/एसटी) निश्चित करण्यासाठी सोडत काढली जाते. तसेच मुंबई महापौरांचा कार्यकाळ अडीच वर्षांचा असतो.







