वृत्तसंस्था : मध्य पूर्वेत सुरू असलेल्या अमेरिका-इराण संघर्षाला १२ दिवस होत आहेत. या युद्धात आता मुंबईच्या एका मरिन इंजिनिअरचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. मुळचे बिहारचे असलेले देवानंद प्रसाद सिंह (वय ५०) हे २०१९ साली मुंबईला येऊन स्थायिक झाले. मरिन इंजिनिअर असलेले सिंह कार्गो शिपवर काम करत होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.
देवानंद सिंह सध्या इराकमधील सेफसी विष्णू तेलाच्या जहाजावर अतिरिक्त मुख्य अभियंता (अधीक्षक) म्हणून काम करत होते. इराकच्या बसरा येथे असलेल्या खोर अल झुबैर बंदरावर उभ्या असलेल्या सेफसी विष्णू जहाजावर हल्ला झाला. या हल्ल्यात त्यांचे निधन झाले. मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी इराण-इस्रायल युद्धामुळे त्यांच्या जहाजावर हल्ला झाला. या हल्ल्यात देवानंद सिंह यांना दुखापत झाली, नंतर त्यांचा मृत्यू ओढवला. देवानंद यांच्यासह आणखी १५ भारतीय खलाशी याठिकाणी होते, त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. या हल्ल्याचा एक व्हिडीओही समोर आला आहे. रात्रीच्या काळोखात दोन जहाजांवर इराणचे ड्रोन येऊन आदळले होते. यानंतर आगीचा मोठा गोळा जहाजावर दिसून आला. सफेसी विष्णू या तेलवाहू जहाजावरही हल्ला झाला. त्यात देवानंद सिंह यांचा मृत्यू झाला. सफेसी विष्णूचे व्यवस्थापन आणि भागीदारांनी सिंह यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला असून त्यांच्या कुटुबियांच्या पाठिशी असल्याचे म्हटले आहे. सिंह यांचे कुटुंब आणि इतर बाधित खलाशांना आवश्यक ती मदत केली जाईल, असेही व्यवस्थापनाने जाहीर केले आहे.







