मुंबई : कार्यान्वित झालेल्या तिन्ही मेट्रो मार्गिकांसाठीचे तिकीट एकत्रित मिळावे, ही प्रवाशांची मागणी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) अंशत: पूर्ण झाली आहे. याअंतर्गत तिकीट एकत्र मिळत नसले तरीही तिकीट काढण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ‘मुंबई वन’ या प्री-पेड कार्डचा वापर तिन्ही मेट्रोंमध्ये करण्याची सुविधा प्रवाशांना मिळाली आहे. मुंबईत सध्या मेट्रो-१ (घाटकोपर-वर्सोवा), मेट्रो-२अ (अंधेरी पश्चिम-दहिसर पूर्व) व मेट्रो-७ (गुंदवली-आनंदनगर) या तीन मेट्रो सुरू असून त्या एकमेकांना संलग्न आहेत. यापैकी मेट्रो-२अ व मेट्रो-७ची उभारणी ‘एमएमआरडीए’ने केली आहे. त्यांचे संचालनही ‘एमएमआरडीए’ची उपकंपनी महामुंबई मेट्रो संचालन कंपनी लिमिटेड (एमएमएमओसीडब्ल्यू) ही करीत असून, या मार्गिका संयुक्त स्वरूपात कार्यान्वित आहेत. त्यामुळेच या दोन्ही मेट्रो मार्गिकांवरील सर्व ३१ स्थानकांसाठीचे तिकीट कुठल्याही स्थानकावरून काढता येणे शक्य आहे. मेट्रो-१चे संचालन मात्र मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड ही स्वतंत्र खासगी कंपनी करीत असल्याने तिचे तिकीट काढता येत नाही. मेट्रो-२अ व मेट्रो-७ या दोन्ही मार्गिकांवरील प्रवासी मोठ्या प्रमाणात मेट्रो-१चादेखील वापर करतात. त्यामुळेच त्यांना दिलासा देण्यासाठी ‘एमएमआरडीए’ने पुढाकार घेतला आहे.
याअंतर्गत नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डचा (मुंबई वन) वापर तिन्ही मेट्रोचे तिकीट काढण्यासाठी करता येणार आहे. ही सोय ‘एमएमआरडीए’ने उपलब्ध केली आहे. असेच प्री-पेड कार्ड मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडूनही दिले जाते. मात्र त्याचा उपयोग मेट्रो-१खेरीज अन्य कुठेही करता येत नाही. त्याचवेळी ‘मुंबई वन’ या कार्डाचा उपयोग मेट्रो सेवेसह बेस्ट बस, तसेच अन्य काही निवडक खरेदी केंद्रांवरही करता येतो. सर्व मेट्रोचे तिकीट एकाच ठिकाणाहून काढता येण्यासाठी सर्व सेवा एकाच छताखाली असणे आवश्यक आहे. त्यासाठी या मेट्रो सेवा एकाच कंपनीकडून चालवल्या जाव्यात, असे मुंबईतील मेट्रो मार्गिकांचा आराखडा तयार केलेल्या दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (डीएमआरसी) म्हटले आहे. त्यादृष्टीने मेट्रो-१ ‘एमएमआरडीए’च्या अधिपत्याखाली आणण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यासाठी राज्य सरकारच्या विशेष समितीकडून अभ्यास सुरू आहे.