वसई : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय यांनी नागरिकांना दिलासा देणारी मोठी कामगिरी केली आहे. आयुक्तालयाच्या अंतर्गत येणाऱ्या विविध पोलीस ठाण्यांनी गुन्ह्यांमध्ये जप्त केलेला तब्बल ७ कोटी ८६ लाख ९९ हजार रुपयांचा मुद्देमाल शुक्रवारी तक्रारदारांना परत केला. पोलीस आयुक्तांच्या हस्ते हा मुद्देमाल सन्मानपूर्वक सुपूर्द करण्यात आला. चोरीला गेलेल्या वस्तू पुन्हा मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करत पोलिसांचे आभार मानले. वसई-विरार आणि मिरा-भाईंदर परिसरात चोरी, जबरी चोरी, मोबाईल चोरी, घरफोडी तसेच सायबर फसवणुकीच्या अनेक घटना घडल्या होत्या. या प्रकरणांमध्ये संबंधित पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले होते.
या गुन्ह्यांचा तपास करून पोलिसांनी चोरीला गेलेला मुद्देमाल शोधून जप्त केला. त्यानंतर आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून संबंधित तक्रारदारांना त्यांचा ऐवज परत करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परत करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये वाहने, मोबाईल फोन, सोने-चांदीचे दागिने तसेच सायबर गुन्ह्यांमध्ये फसवणूक झालेली रोख रक्कम यांचा समावेश आहे. एकूण ७ कोटी ८६ लाख ९९ हजार रुपयांचा ऐवज नागरिकांना परत मिळाल्याने तक्रारदारांमध्ये आनंदाचे वातावरण होते. या कार्यक्रमाला निकेत कौशिक, दत्तात्रय शिंदे, सर्व पोलीस उपआयुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त, विविध पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, पत्रकार तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.







