ठाणे : कल्याण पश्चिमेतील बिर्ला महाविद्यालय परिसरातील संदीप हॉटेल भागात रविवारी एका पिसाळलेल्या भटक्या श्वानाने अक्षरशः धुमाकूळ घालत सुमारे १३० नागरिकांना चावा घेतल्याची धक्कादायक घटना घडली. रविवारी दुपारी २ ते रात्री ८ वाजेपर्यंत हा श्वान परिसरातील रस्ते, गल्लीबोळ आणि सोसायट्यांमध्ये फिरत नागरिक, पादचारी तसेच दुचाकी आणि रिक्षाचालकांच्या मागे धावत त्यांच्यावर हल्ला करत होता. श्वान पिसाळलेला असल्याची माहिती नसल्याने अनेक नागरिक नेहमीप्रमाणे रस्त्यावर वावरत होते. मात्र हा श्वान अचानक मागून येऊन चावा घेत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. श्वानदंश झालेल्या २५ जणांवर महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचार सुरू असून, काहींना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. तर ११ वर्षांच्या एका मुलीवर श्वानाने गंभीर हल्ला केल्याने तिला पुढील उपचारांसाठी मुंबईतील शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर बिर्ला महाविद्यालय, जुने आरटीओ कार्यालय, भोईरवाडी आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. अनेकांनी मुलांना घराबाहेर खेळण्यासाठी पाठवणे टाळले, तर काहींनी आवश्यक कामांशिवाय बाहेर पडणेही बंद केले. नागरिकांनी महापालिकेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र सुट्टी असल्याने प्रशासनाकडून तत्काळ प्रतिसाद मिळाला नसल्याची तक्रार करण्यात आली.
या घटनेनंतर महापालिकेच्या कार्यपद्धतीवर स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. भटक्या श्वानांची समस्या वाढत असताना पालिकेच्या श्वान निर्बिजीकरण केंद्राने किंवा संबंधित विभागाने तातडीने कारवाई का केली नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. दुपारपासूनच श्वानदंश झालेल्या नागरिकांची संख्या वाढत असल्याने रुग्णालय प्रशासनाने संबंधित श्वानाला पकडण्यासाठी तातडीने सूचना देणे आवश्यक होते, असे स्थानिकांचे मत आहे. वैद्यकीय अधिकारी संदीप पगारे यांनी सांगितले की, दुपारपासून श्वानदंश झालेल्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत गेली असून, आतापर्यंत सुमारे ११० ते १३० रुग्णांची नोंद झाली आहे. २५ रुग्णांना दाखल करून उपचार सुरू आहेत, तर इतरांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले असून काहींना पुढील उपचारासाठी बोलावण्यात आले आहे. दरम्यान, हल्लेखोर श्वानाचा शोध घेण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच खडकपाडा आणि महात्मा फुले पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी रात्रभर परिसरात शोधमोहीम राबवत होते. या घटनेमुळे भटक्या श्वानांच्या वाढत्या समस्येकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.






