मुंबई : राज्यातील देह विक्री व्यवसायात असलेल्या महिलांच्या विविध अडचणी आहेत. या अडचणी सोडविण्यासाठी शासन कार्यवाही करीत आहे. या व्यवसायात असलेल्या महिलांच्या मुलांचे पालन-पोषण करणे, शिक्षण देण्याबरोबरच त्यांचे पुनर्वसन करण्यात यावे, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले. तसेच देह विक्री व्यवसायातील महिलांच्या मुलांसाठी विशेष केंद्र सुरू करण्याचा उपक्रम ‘स्वाधार’ योजनेच्या सहाय्याने राबविण्याच्या सूचनाही मंत्री कु. तटकरे यांनी दिल्या. मंत्रालयालयातील त्यांच्या समिती कक्षात देह विक्री व्यवसायातील महिलांच्या मुलांसाठी करावयाच्या पुनर्वसनासंदर्भात सुरू असलेल्या कार्यवाहीचा मंत्री कु. तटकरे यांनी आढावा घेतला. या बैठकीत एज्युकेशनल ॲण्ड कल्चर्रल ट्रस्टच्या विश्वस्त डॉ. निशिगंधा वाड, गोल्डन लेटर्स बाल विकास फाऊडेशनच्या अध्यक्ष आणि विश्वस्त डॉ. राणी खेडीकर यांच्यासह सामाजिक संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मंत्री कु.तटकरे म्हणाल्या की, बालकांची काळजी आणि सुरक्षा कायद्याअंतर्गत देह विक्री करणाऱ्या महिलांच्या बालकांसाठी एक कुटुंब निर्माण करून त्यांचे संरक्षण करण्यात येणार आहे. तसेच या बालकांचे पालन- पोषण करण्यासाठी याच क्षेत्रातील वयाची सीमा पार केलेल्या महिलांना नियुक्त करण्यात येणार आहे. जेणेकरून या महिलांनाही उदरनिर्वाहाचे साधन प्राप्त मिळेल. महिलांसह बालकांचे पुनर्वसन करण्यासाठी स्वाधार योजनेच्या सहायाने हा उपक्रम राबविण्यात यावा. मुंबई, नागपूर आणि पुणे शहरात देह विक्री करणाऱ्या महिलांचे आणि त्यांच्या बालकांचे पुनर्वसन संदर्भातील केंद्र योग्यरित्या सुरू रहावीत, तसेच अंगणवाडी केंद्र सुरू करून संबंधित महिलांना आधार कार्ड अदा करण्याचे कार्य गोल्डन लेटर्स बाल विकास सामाजिक संस्थेने केले आहे. पुढे त्यांच्या पुनर्वसनासंदर्भातील संस्थेचे काम असेच सुरू रहावे, असेही मंत्री कु. तटकरे म्हणाल्या. तसेच या महिलांच्या पाल्यांचे पुनर्वसन करताना त्यांच्या सुरक्षेबाबत नियम बनवून त्याची अंमलबजावणी करावी. त्यांच्यासोबत कोणताही गुन्हा घडू नये, यासाठी दक्षता आणि पूर्व नियोजन असणे आवश्यक आहे, असे मंत्री कु. तटकरे यांनी यावेळी सांगितले.