वसई : नालासोपारा पूर्वेच्या समर्थ नगर भागात असलेल्या एका धोकादायक इमारतीचा पाया कमकुवत झाला असून पिलरला तडे गेल्याची घटना समोर आली. कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडू नये यासाठी या इमारतीत राहणाऱ्या १६ कुटुंबांचे पालिकेने स्थलांतर केले आहे. मागील काही दिवसांपासून वसई विरार भागात पाऊस सुरूच आहे.नालासोपारा पूर्वेच्या समर्थनगर भागात चार मजली अनेक वर्षे जुनी झालेली धोकादायक इमारत होती. या इमारतीच्या एका पिलरला तडे गेले. त्यामुळे या भागात राहत असलेल्या नागरिकांनी घराच्या बाहेर धाव घेतली.
याची माहिती पालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांना मिळताच घटनास्थळी धाव घेत या राहत असलेल्या १६ कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले असल्याची माहिती पालिकेने दिली आहे. पालिकेने पावसाळ्यापूर्वीच या धोकादायक असलेल्या इमारतीला नोटीस बजावली होती व तश्या सूचना ही येथील नागरिकांना दिल्या होत्या. सद्यस्थितीत या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. यातील काही नागरिक बाजूच्या इमारतीमध्ये राहण्यास गेले आहेत तर काहींची पालिकेच्या वरूण इंडस्ट्री मधील संक्रमण शिबिरात व्यवस्था करण्यात आली असल्याचे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे यांनी सांगितले आहे. याशिवाय ही धोकादायक स्थितीत असलेली इमारत जमीनदोस्त करण्यात येणार असल्याचेही मनाळे यांनी सांगितले.