मुंबई : विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागावाटपासाठी बैठकांवर बैठका सुरू आहेत. महायुतीचा जागा वाटपाचा फार्म्युला जवळपास फायनल झाला आहे, पण महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाबाबतची चर्चा गुरूवारपर्यंत सुरूच होती. अखेर त्यांचा देखील जागा वाटपाचा फार्म्युला ठरला आहे. महाविकास आघाडीमध्ये १००-८०-८० फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये जागा वाटपाचा फायनल फॉर्म्युला ठरला आहे. आतापर्यंत २८८ जागांपैकी २६० जागांचे वाटप पूर्ण झाले आहे. यामधील १०० जागा काँग्रेस पक्षाला तर उद्धव ठाकरे गटाला ८० आणि शरद पवार गटाला ८० जागा देण्यावर आघाडीतील नेत्यांनी शिक्कामोर्तब केला आहे. महाविकास आघाडीने उर्वरीत २८ जागा या मित्र पक्षांना सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या २८ जागांवर दोन पक्षांनी दावा केला आहे. हा २८ जागांचा तिढा अद्याप सुटलेला नाही. या जागांवर सध्या महाविकास आघाडीमध्ये चर्चा सुरू आहे. येत्या दोन दिवसांत हा तिढा देखील सुटेल आणि जागा वाटपाचा निर्णय जाहीर करण्यात येईल अशी माहिती समोर आली आहे. येत्या रविवारी महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा निर्णय जाहीर केला जाईल.
दरम्यान, महाविकास आघाडीमध्ये रामटेक, दक्षिण नागपूरच्या जागेवरून वाद कायम आहे. मविआच्या बैठकीत उद्धव ठाकरे गट, काँग्रेस दोन्ही पक्ष रामटेक, दक्षिण नागपूरसाठी आग्रही असल्याने दोन्ही जागांची चर्चा थांबली आहे. आज पुन्हा या दोन्ही जागांवर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. कामठी काँग्रेसला तर हिंगणा राष्ट्रवादी शरद पवार गटाला सोडण्यास सहमती झाली आहे. रामटेक, दक्षिण नागपूर ऐवजी राज्यात दुसरीकडे जागा, उबाठाला वाढवून देण्याचा पर्याय काँग्रेसकडून दिला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे महायुतीत आशिष जयस्वालला उमेदवारी दिल्यानं माजी आमदार रेड्डी यांनी वेगळी चूल मांडण्याचा तयारीत असल्याने यात महाविकास आघाडीत दोन्ही पक्ष डोळा ठेवून बसले आहेत.