जालना : मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. गेल्या काही दिवसांपासून ते निवडणुकीसाठी उमेदवार उभे करणार असल्याचं सांगत होते. त्याबाबत चर्चाही सुरु होती. मात्र, आज त्यांनी मोठा निर्णय जाहीर करत निवडणुकीतून माघार घेतली आहे. मित्र पक्षांची यादी आली नाही. राज्यात एका जातीवर कोणीही निवडून येत नाही. म्हणून आपण थांबवू घेऊ, एका जातीवर निवडून येत नाही आता पाडापाडी करायचं ठरलं, असं मनोज जरांगे म्हणाले आहेत. काल मराठा बांधवांशी चर्चा झाली, मतदारसंघही ठरले. एका जातीवर कोणी निवडणूक जिंकू शकत नाही. मित्रपक्षांकडून उमेदवारांची यादी आली नाही, तर लढायचं कसं, मग मराठा बांधवांना विचारलं एका जातीवर निवडणूक लढवायची का, तर असं ठरलं की एका जातीवर निवडणूक जिंकून येता येणार नाही. त्यामुळे आपल्याला निवडणूक लढवायची नाही, असं जरांगे पत्रकार परिषदेत म्हणाले.
त्यामुळे सर्व मराठा बांधवांना सांगतो आपले अर्ज मागे घ्या. आपला काही खानदानी धंदा नाही. आपली फसगत होईल. त्यामुळे सर्व अर्ज मागे घ्या. एकही अर्ज ठेवू नका. निवडणूक संपली की आपलं आंदोलन सुरु करु. पुन्हा आपल्या जातीसाठी आपण लढू, असं मनोज जरांगे यावेळी म्हणाले. याला पाड आणि त्याला पाड म्हणायची माझी इच्छा नाही. जिंकून कोणी तिसराच येणार. कोणीच आपल्या कामाचं नाही. मला असं करण्याची इच्छा नाही, असंही ते म्हणाले. कोणाच्याही प्रचाराला मला जायचं नाही. तसेच, आमचा कोणत्याही पक्षाला, अपक्ष उमेदवाराला पाठिंबा नाही, असंही मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं.