पुणे : महसूल सप्ताह महसूल विभागापुरता मर्यादित न ठेवता सर्व विभागांना सहभागी करुन यशस्वी करावा आणि सप्ताहाच्या निमित्ताने सर्वसामान्य नागरिकांची कामे गतीने पूर्ण करावीत, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. विधानभवन येथे विभागीय आयुक्तालयातून राज्यस्तरीय महसूल दिन व महसूल सप्ताहाचा शुभारंभ तसेच सर्व विभागीय आयुक्त व सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद कार्यक्रमात श्री. पवार बोलत होते. यावेळी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, महसूल व वन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा, विभागीय आयुक्त सौरभ राव, राज्याचे जमाबंदी आयुक्त एन. के. सुधांशू, नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक हिरालाल सोनवणे आदी उपस्थित होते.
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्यामुळे राज्याच्या प्रशासनाचा नावलौकिक असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा आहे. फक्त कणा मजबूत असून चालणार नाही तर संपूर्ण शरीर मजबूत असावे लागते. त्यासाठी कृषी, आरोग्य, सिंचन, जलसंपदा, सहकार यासह अन्य सर्व विभागांना एकत्र घेऊन काम करावे. अधिकाऱ्यांनी प्रशासनाची कामगिरी उत्तम होईल यासाठी प्रयत्न करावेत. प्रशासकीय व्यवस्था अधिक गतिमान करण्याचे काम करताना परस्पर समन्वय ठेवावा.
नागरिकांची कामे वेळेत करण्यासोबत जनकल्याणकारी योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवून लोकाभिमुख काम करावे. शासकीय योजनांमध्ये लोकांचा सहभाग वाढवण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांच्या संकल्पनेतून ‘शासन आपल्या दारी’ हे अभियान राबविण्यात येत आहे. या निमित्ताने आपले जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय व ग्रामस्तरीय अधिकारी, कर्मचारी लोकांपर्यंत जात आहेत. या माध्यमातून राज्यभरात सुमारे १ कोटी नागरिकांना विविध शासकीय लाभ देण्यात आले आहेत. शासनाची प्रतिमा उंचावण्यासाठी महसूल विभागाने नेहमीच अग्रेसर राहणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.





