मुंबई : विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने महाविकास आघाडीचा पराभव केला. महायुतीच्या विजयानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत विरोधक टीका करत आहेत. ईव्हीएमच्या घोटाळ्यावरून आता महायुतीमधून बाहेर पडलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी खळबळजनक दावा केला आहे. ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्यामुळे महायुतीचा विजय झाला असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. याचसोबत त्यांनी महायुतीमधून बाहेर पडण्यामागचे कारण देखील सांगितले आहे. महादेव जानकर यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. ‘भाजप कोणाला मुख्यमंत्री करेल यात मला अजिबात पडायचं नाही. पण अनेक ठिकाणी ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्यामुळे महायुतीच्या जागा निवडून आल्याचा गंभीर आरोप महादेव जानकर यांनी यावेळी केला.
महादेव जानकर यांनी सांगितले की, ‘ईव्हीएमवर माझा आक्षेप असून देशभरात ईव्हीएमविरोधात आंदोलन करणार आहे. ईव्हीएममुळे देशाची लोकशाही धोक्यात आहे. ईव्हीएम हॅक करता येत. मी स्वतः इंजिनिअर आहे त्यामुळे मला सगळं माहिती आहे.’, तसंच, ‘सुप्रीम कोर्ट, निवडणूक आयोग सगळे त्यांचे आहेत. त्यामुळं याला लोकशाही म्हणता येणार नाही., असे मत त्यांनी व्यक्त केले. महायुतीमधून बाहेर पडण्यामागचे कारण सांगताना महादेव जानकर म्हणाले की, ‘मला महायुतीचा अनुभव खूप वाईट आला आहे त्यामुळं मी त्यांच्यातून बाहेर आलो आहे. काँग्रेसला अजून चाखलं नाही त्यामुळं त्यांच्याकडे न जाता स्वतंत्र पुढे जायची आमची भूमिका आहे. त्यामुळं येत्या काळात आमची एकला चलोची असेल.’ तसंच, ‘माझ्या पक्षाचा राज्यात सध्या एकच आमदार आहे. कोणासोबत जायचं याचा अजून निर्णय झालेला नाही. पण जर त्या आमदाराने पक्षाला न विचारता काही निर्णय घेतला तर त्यावर नक्की आम्ही कारवाई करू.’ असा इशारा महादेव जानकर यांनी दिला. त्यांनी रासपचे आमदार रत्नागर गुट्टे यांना हा इशारा दिला आहे.