ठाणे : महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व हवामान बदल विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) आणि ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच हिंदुस्तान कोका-कोला बेव्हरेजेसच्या सहकार्याने ‘महा r-PET अभियान’ अंतर्गत वापरलेल्या पीईटी (PET) प्लास्टिक बॉटल्स संकलन मोहिमेचा भव्य शुभारंभ २ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता ठाण्यातील एल.बी.एस. रोडवरील हॉटेल ताज विवांता येथे होणार आहे. वापरलेल्या प्लास्टिक बाटल्यांचा पुनर्वापर करून त्यांना नवजीवन देणे आणि प्लास्टिक कचरा कमी करत पर्यावरण संवर्धनाला चालना देणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. या अभियानामुळे प्लास्टिक कचऱ्याचे शाश्वत व्यवस्थापन, पुनर्वापराला प्रोत्साहन आणि पर्यावरण संरक्षणासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढविण्यावर भर दिला जाणार आहे.
या मोहिमेचा शुभारंभ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असून, पर्यावरण व हवामान बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. प्लास्टिक प्रदूषणावर प्रभावी नियंत्रण मिळविणे आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीला प्रोत्साहन देण्यासाठी हे अभियान महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. वापरलेल्या पीईटी प्लास्टिक बॉटल्स संकलित करून त्यांचा पुनर्वापर करण्याच्या या उपक्रमामुळे परिपत्र अर्थव्यवस्थेला (Circular Economy) चालना मिळणार असून, पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने ठोस पाऊल उचलले जाणार आहे. या अभियानात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन वापरलेल्या प्लास्टिक बाटल्या संकलनासाठी पुढाकार घ्यावा आणि स्वच्छ, हरित व पर्यावरणपूरक महाराष्ट्राच्या निर्मितीत आपला सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.





