पुणे : जन्मठेपेची शिक्षा सुनावलेला कैदी येरवड्यातील खुल्या कारागृहातून पसार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी कैद्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल मेघदास पटोनिया (वय ३५) असे पसार झालेल्या कैद्याचे नाव आहे. पटोनिया मूळचा ठाणे जिल्ह्यातील टिटवाळा परिसरात असलेल्या म्हारल गावातील आहे. पटोनिया हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात त्याला जन्मठेपेची शिक्षा तसेच 15 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. खुले कारागृह स्वतंत्र शासकीय संस्था आहे. चांगली वर्तणूक असलेल्या कैद्यांची रवानगी खुल्या कारागृहात केली जाते. पटोनिया याची कारागृहातील वर्तणूक चांगली असल्याने त्याची रवानगी खुल्या कारागृहात केली होती. बुधवारी दुपारी नेहमीप्रमाणे खुल्या कारागृहातील कैद्यांची हजेरी घेण्यात आली. तेव्हा पटोनिया आढळून आला नाही.
दरम्यान, नंतर त्याचा शोध घेण्यात आला. तो पसार झाल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. खुल्या कारागृहातील कर्मचारी राजेंद्र मरळे यांनी याबाबत येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, पसार झालेल्या पटोनियावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक आयुक्त प्रांजली सोनवणे यांनी खुल्या कारागृहास भेट दिली. सहायक निरीक्षक टकले तपास करत आहेत.





