नवी दिल्ली : भारत-पाकिस्तान नियंत्रण रेषेवर (एलओसी) तैनात असलेल्या भारतीय जवानांसोबत गणेशोत्सव साजरा करण्याची अनोखी परंपरा यंदाही कायम ठेवण्यात आली आहे. मानवाधिकार कार्यकर्त्या आणि प्रोग्रेसिव्ह नेशनच्या कार्याध्यक्षा ईशरदिदी तसेच प्रोग्रेसिव्ह नेशनचे अध्यक्ष छत्रपती आवटेदादा यांच्या पुढाकारातून ‘किंग ऑफ एलओसी’ गणपतीची ६ फूट उंच भव्य मूर्ती रविवारी, ६ सप्टेंबर २०२६ रोजी मुंबईतून जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्याकडे रवाना झाली. मुंबईतील कुर्ला (पश्चिम) येथील एलबीएस मार्गावरील इंडियन नेव्ही बेसच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ असलेल्या दिव्यांग मूर्तिकार पांढरे यांच्या चित्रशाळेत विधिवत पूजन करून या प्रवासाला सुरुवात करण्यात आली. या उपक्रमाचे यंदाचे सलग १७ वे वर्ष असून, सीमेवर तैनात जवानांसाठी हा उत्सव मानसिक आधार आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक बनला आहे. या प्रसंगी ‘भारतीय फौजी भाई’ या विषयावर आयोजित निबंध लेखन आणि चित्रकला स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा ज्येष्ठ पत्रकारांच्या हस्ते गौरव करण्यात आला. सैनिकांविषयी आदर, देशभक्ती आणि कृतज्ञतेची भावना बालमनात रुजवण्याचा हा प्रयत्न असल्याचे आयोजकांनी सांगितले. सहभागी विद्यार्थ्यांमध्ये आणि त्यांच्या पालकांमध्येही देशसेवेची प्रेरणा जागवण्याचा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या राष्ट्रीय एकात्मतेच्या विचाराला पुढे नेत, सीमेवरील जवानांपर्यंत बाप्पाचे आगमन पोहोचवण्याचा हा उपक्रम आज एक प्रेरणादायी परंपरा ठरला आहे.
पुंछ जिल्हा हा पीरपंजाल पर्वतरांगांमध्ये वसलेला अत्यंत संवेदनशील सीमाभाग असून, येथे दाट जंगल, बर्फाच्छादित पर्वत, वेगवान नद्या आणि कठीण हवामान अशा आव्हानात्मक परिस्थितीत भारतीय जवान देशाचे संरक्षण करतात. अशा परिस्थितीतही दरवर्षी गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जातो. मुंबईहून ‘स्वराज एक्सप्रेस’ने रवाना झालेली मूर्ती सुमारे २,००० किलोमीटर रेल्वे प्रवास करून जम्मू येथे पोहोचते. त्यानंतर आणखी ३०० किलोमीटर दुर्गम डोंगररस्त्यांवरून ट्रकद्वारे पुंछपर्यंत नेली जाते. या संपूर्ण प्रवासात स्थानिक नागरिक आणि सैनिक मोठ्या उत्साहाने बाप्पाचे स्वागत करतात. जे जवान सणासुदीला आपल्या कुटुंबापासून दूर असतात, त्यांच्यासाठी हा गणेशोत्सव म्हणजे घरचीच अनुभूती ठरते. बाप्पाच्या दर्शनातून त्यांना मानसिक बळ, आध्यात्मिक शांतता आणि नवचैतन्य मिळते, असे आयोजक सांगतात. विशेष म्हणजे, गेल्या १७ वर्षांपासून हा संपूर्ण उपक्रम कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत न स्वीकारता स्वखर्चातून राबवला जात आहे. “माझ्या फौजी भावांचा विश्वास मी कधीही तुटू देणार नाही,” अशी भावना व्यक्त करत ईशरदिदी दरवर्षी ही जबाबदारी पार पाडतात, तर छत्रपती आवटेदादा आणि प्रोग्रेसिव्ह नेशनचे कार्यकर्ते या उपक्रमासाठी सातत्याने सहकार्य करतात. सीमेवरील सैनिकांचे मनोबल उंचावणे, राष्ट्रीय एकात्मता अधिक बळकट करणे आणि देशभक्तीची भावना समाजात रुजवणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असून, ‘किंग ऑफ एलओसी’ गणपती आज देशभरातील नागरिकांसाठी प्रेरणादायी परंपरा बनली आहे.






