रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटाला पर्याय असलेल्या दोन बोगद्यांपैकी एका बोगद्याअंतर्गत अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी २० सप्टेंबरपासून वाहतूक बंद करण्यात येणार आहे. हा बोगदा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ५ सप्टेंबरपासून वाहतुकीस मोकळा केला होता. यंदा २५ फेब्रुवारीपासून शिमगोत्सवापूर्वी कशेडी बोगद्यातून लहान वाहनांना या बोगद्याचा वापर कोकणात येण्यासाठी करण्याची परवानगी देण्यात आली. एक वर्षानंतर अपूर्ण असलेला दुसरा बोगदाही गणेशोत्सवाच्या तोंडावर मुंबईहून कोकणात जाणार्या वाहनांसाठी सुरू करण्यात आला. त्यामुळे चाकरमान्यांचा प्रवास सुरळीत झाला होता. कशेडी घाटातील ४५ मिनिटांचा वळणावळणाचा वेळ वाचला होता. इंधनाची बचतीसह वाहतूक कोंडीपासून मुक्तता मिळाली होती.
कशेडी घाटाला पर्याय असलेल्या दोन्ही बोगद्यातील खबरदारीचा उपाय म्हणून बांधकाम खात्याने विशेष काळजी घेतली. दोन्ही बोगद्यातून प्रवास करताना वाहनांचा वेग कमी ठेवण्यात आला होता. दोन्ही बोगद्यांच्या प्रवेशद्वारावर सुरक्षा कर्मचारी नेमण्यात आले होते. त्यामुळे कशेडी घाटातून येण्याचा चाकरमान्यांचा वेळ वाचला आहे. कशेडी बोगद्याच्या अपूर्ण असणारी गटार लाईन, दर्शनी भाग, संरक्षक भिंत, अपूर्ण सिमेंट काँक्रीटीकरणचे कामासह लाईट, डिजिटल वेग टायमिंगची कामे पूर्ण करायची असल्याने पुन्हा बंद ठेवण्यात येणार आहे.