मुंबई : शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या कमी असली की अशा शाळा बंद करण्याची तयारी केली जाते. असे असताना आता शाळांमध्ये विद्याथीं पटसंख्या कमी असली म्हणून यापुढे राज्यातील कोणतीही शाळा बंद केली जाणार नाही, अशी ग्वाही ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली. राज्यातील जिल्हा परिषदांमधील (जिल्हा परिषदा) प्राथमिक शिक्षकांच्या बदली प्रक्रिया (बदली प्रक्रिया) आणि रिक्तपदांच्या स्थितीवर प्रश्नोत्तराच्या तासात चर्चा झाली.
विद्याथींसंख्या कमी असल्याने राज्यातील ६०० शाळा बंद होणार असल्याची भीती सभागृहात सदस्यांनी व्यक्त केली. गोरे म्हणाले, २०२५ साठी बदलीप्रक्रिया पूर्ण झाली. यावर्षी बदली प्रक्रियेंतर्गत सुमारे ६६५२० शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. बदली झालेल्या शिक्षकांमध्ये विशेष संवर्ग शिक्षक भाग १ मधील ५०४ शिक्षक, विशेष संवर्ग २ मधील ४५८८ शिक्षक आणि बदली अधिकार असलेल्या ४८६१ सामान्य शिक्षकांच्या बदल्यांचा समावेश आहे. सदस्यांनी ऑक्टोबरपर्यंत बदली प्रक्रिया सुरू असल्याकडे लक्ष वेधले. ही प्रकिया जूनपर्यंत पूर्ण करण्याची मागणी केली. त्यावर सरकारने सहमती दर्शविली. तसेच, मे अखेरपर्यंत प्रक्रिया पूर्ण होतील, अशी ग्वाही दिली.







