मुंबई : राज्यात तळीरामांसाठी महत्वाची बातमी आहे. मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबईत पाचव्या टप्प्यात २० मे रोजी लोकसभेसाठी मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर १८ ते २० मे दरम्यान मद्यविक्रीला मनाई करण्यात आली आहे. या काळात मद्यविक्रीस बंदी घालण्यात आल्याचे आदेश देण्यात आले आहेत. या निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहे. सुरुवातीला निकालाच्या दिवशी मद्यविक्रीस बंदी घालण्यात आल्याचं ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात सांगितलं होतं. मात्र, याविरोधकात याचिकाकर्त्यांनी सुधारित आदेश देण्याची मागणी केली होती. याप्रकरणी त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मतदानाच्या दोन दिवस आधी महाविक्री बंदी घालण्यास आक्षेप नाही. परंतु, निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी (Lok Sabha Election Result) मद्यविक्रीला बंदी जाचक असल्याचं याचिकाकर्त्यांच्या वकील आर. डी. सोनी यांनी न्यायालयात सांगितलं होतं.
निकालाच्या दिवशी सायंकाळ नंतर मद्यविक्रीला परवानगी देण्यात यावी, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती. त्यांनी ठाणे जिल्ह्याधिकाऱ्यांनी काढलेल्या मद्यविक्री बंदीच्या आदेशामध्ये सुधारणा करण्याची मागणी केली होती. यापूर्वी न्यायालयाने दिलेला अशा आदेशांचा दाखला देखील यावेळी त्यांनी दिला होता. यावेळी अतिरिक्त सरकारी वकील अश्विनी पुरव यांनी न्यायालयात याचिकाकर्त्यांच्या या मागणीला विरोध केला होता. परंतु, याचिकाकर्त्यांचे बाजु लक्षात घेऊन खंडपीठाने जिल्ह्याधिकाऱ्यांनी काढलेल्या मद्यविक्री बंदीच्या आदेशात सुधारणा केली आहे. त्यांनी निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होईपर्यंत मद्यविक्री बंदीचा आदेश लागू राहील, असं सांगितलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबईत १८ ते २० मे आणि ४ जुनपर्यंत मतदानाचा निकाल जाहीर होईपर्यंत मद्यविक्री बंद राहणार आहे.