मुंबई : घाटकोपर येथे पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत १४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर ७४ जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर आता मुंबई महानगर पालिकेला जाग आली आहे. पालिकेकडून घटनास्थळावर लावण्यात आलेले उर्वरित ३ अनधिकृत होर्डिंग विरोधात कारवाई करत ते पाडण्यात येणार आहे. या दुर्घटनेनंतर राजकारण चांगलेच तापले आहे. अनेक राजकीय पक्षांनी मुंबई महानगर पालिका आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर आता मुंबई महानगर पालिकेने मुंबईतील अनधिकृत होर्डिंगविरोधात करवाई करण्यास सुरुवात केली आहे. घटनास्थळावरून उर्वरित तीनही अनधिकृत होर्डिंगवर काही वेळातच कारवाई होणार आहे. या होर्डिंगचे सर्वेक्षण करून काही वेळातच ते पाडली जाणार आहेत. मुंबईत एकूण १०२५ अनधिकृत होर्डिंग आहेत. पालिका या सगळ्या होर्डिंग मालकांना नोटीस पाठवणार आहेत. त्यानंतर स्ट्रॅकचरल ऑडिट करून १० दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तर १७९ होर्डिंग रेल्वेच्या हद्दीत असल्याची माहिती समोर आली आहे. रेल्वेच्या हद्दीतील होर्डिंग मालकांना देखील पालिका नोटीस पाठवणार आहे.
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणी छगन भुजबळ यांनी सरकारलाच घरचा आहेर दिला आहे. मृतांना पाच लाखांची मदत देऊन काय होतं? असा सवाल करत याप्रकरणी कठोर कारवाई करायला पाहिजे असे मत छगन भुजबळांनी व्यक्त केले. या घटनेत ठेकेदार यांचा मातोश्री संबंध समोर आलाय. तर याच्यात उद्धव ठाकरे यांचा काय संबंध असा सवाल छगन भुजबळ यांनी केलाय. तरी याप्रकरणी राजकारण न करता संबंधितावर कठोर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे. घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणी भाजप नेते नितेश राणे यांनी देखील प्रतिक्रिया दिली. हे होर्डिंग ज्या संबंधित कंपनीचे होते तिला मुंबई महानगरपालिकेने आधीच नोटीस बजावली होती. होर्डिंग लावण्याचा कार्यकाळ संपलेला आहे म्हणून हे होर्डिंग काढून टाका, असे नोटीसमध्ये म्हटले होते. तरीही त्या मालकाने काही ऐकलं नाही. मालकाचे नाव भावेश भिडे आहे. हा भावेश भिडे नेमका कोणाचा पार्टनर आहे? संजय राऊत यांचा भाऊ सुनील साऊत याचा भावेशसोबत काय संबंध आहे?, असा सवाल नितेश राणेने केला आहे. तसंच, “भावेश भिडेचे जे पार्टनर आहेत आणि ज्यांच्यामुळे निष्पाप मुंबईकरांना जीव गमवावा लागला. ते होर्डिंग वेळेत काढले असते तर ते सगळे मुंबईकर आज जीवंत असते. या घटनेला जबाबदार असलेल्या सर्वावर गुन्हे दाखल करा आणि अटक करा.’, अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे.