मुंबई : रेल्वे स्थानकात अस्वच्छता करण्याऱ्या आणि थुंकणाऱ्या प्रवाशांना आता १०० रुपये दंड भरावा लागणार आहे. येत्या आठवड्यापासून मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनसमध्ये (एलटीटी) तीन महिन्यांसाठी रेल्वे क्लिन अप मार्शलची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘एलटीटी’मध्ये मार्शलचा प्रयोग यशस्वी झाल्यास अन्य स्थानकांतही याचा विस्तार करण्यात येणार आहे. सध्या रेल्वे स्थानकांत स्वच्छता ठेवण्यासाठी स्वच्छता कामगारांची नियुक्ती करण्यात आली आहे. मनुष्यबळांसह मशीनच्या मदतीने स्थानकांत स्वच्छता राखली जाते. मात्र, प्रवाशांची प्रचंड वर्दळ पाहता स्वच्छता राखण्यात रेल्वे प्रशासन अपयशी ठरत आहे. प्रवासी आणि मार्शल यांच्यातील वाद टाळण्यासाठी रेल्वे स्थानकांवरील क्लीन अप मार्शलना दंड आकारण्यापूर्वी पुरावा म्हणून टाइम स्टॅम्पसह स्नॅप घेण्याच्या सूचना रेल्वे प्रशासनाने दिल्या आहेत. मार्शलला दंड घेण्याचा अधिकार नाही. अस्वच्छता करणाऱ्या प्रवाशांना रेल्वे स्थानकातील तिकीट तपासणीसांकडे घेऊन जावे लागणार आहे. पुराव्याची पडताळणी केल्यानंतर टीसी दंड आकारून त्याची पावती प्रवाशांना देणार आहे, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
रेल्वे फलाटांवर कचरा टाकणाऱ्या, रेल्वे स्थानकांवर थुंकणाऱ्या आणि रिकामी पाण्याची बाटली, वेफर्सची आवरणे कचराकुंडीत न टाकता इतरत्र फेकणाऱ्या आणि अस्वच्छता पसरवणाऱ्या बेशिस्त प्रवाशांना १०० रुपये दंड आकारण्यात येणार आहे. सुरुवातीला २०० रुपयांच्या दंडाचा प्रस्ताव होता, मात्र चर्चेअंती तो शंभर रुपये करण्यात आला आहे. मार्शलची पोलिस पडताळणी आवश्यक आहे. पोलिस पडताळणीनंतर कंत्राटदाराला मार्शल नियुक्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. क्लीन-अप मार्शल आणि सुपरवायझरसाठी किमान शैक्षणिक पात्रता अनुक्रमे एसएससी उत्तीर्ण आणि एचएससी उत्तीर्ण अशी आहे. रेल्वे स्थानकात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. यामुळे जाणीवपूर्वक चुकीच्या पद्धतीने दंडवसुली झाल्यास कंत्राटदार आणि मार्शलवर कारवाई करण्यात येईल. प्रवाशांनी चुकीच्या पद्धतीने वाद घालण्याचा प्रयत्न केल्यास त्यासाठी सीसीटीव्हीच्या माध्यमातून सत्यता पडताळणी केली जाणार आहे, असेही रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. मुंबई महापालिकेने शहरात अस्वच्छता करणाऱ्यांवर कारवाईसाठी क्लिन-अप मार्शलची नियुक्ती केली होती. करोनाकाळात मार्शलवर मास्क तपासण्याची जबाबदारी देण्यात आली होती. सध्या शहरात महापालिकेकडून क्लिन-अप मार्शलची नियुक्ती झालेली नाही.