पुणे : राज्यातील अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत असून, विशेष फेरी-३ अंतर्गत राज्यभरातील १ लाख ७ हजार ४९२ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. त्यांच्या माहितीनुसार, २२ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत कॅप (CAP) प्रक्रियेद्वारे ९६ हजार ५६७, तर इनहाऊस, व्यवस्थापन आणि अल्पसंख्याक कोट्यातून १० हजार ९०५ विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केले.
राज्यातील ९ हजार ६९८ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू असून, आतापर्यंत १५ लाख १८ हजार ९७० विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. त्यापैकी १२ लाख ६० हजार ८९० विद्यार्थ्यांचे प्रवेश विविध फेऱ्यांमधून निश्चित झाले आहेत. नियमित तीन फेऱ्या आणि विशेष दोन फेऱ्या पूर्ण झाल्यानंतरही प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष फेरी-३ आयोजित करण्यात आली होती. या फेरीत १ लाख ६५ हजार १३५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. त्यापैकी १ लाख १२ हजार ८८० विद्यार्थ्यांना २० जुलै रोजी महाविद्यालयांचे वाटप करण्यात आले होते. त्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करण्यासाठी दिलेल्या मुदतीत १ लाख ७ हजार ४९२ विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात प्रवेश निश्चित केला. या प्रक्रियेमुळे मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना इच्छित किंवा उपलब्ध महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळाला असून राज्यातील अकरावी प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत आहे. दरम्यान, नियमित तीन आणि विशेष तीन अशा एकूण सहा फेऱ्या पूर्ण झाल्यानंतरही ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला नाही, त्यांच्यासाठी विशेष फेरी-४ आयोजित करण्यात आली आहे. ही फेरी २४ जुलै २०२६ पासून सुरू होणार असून त्याचे सविस्तर वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
विशेष फेरीचे वेळापत्रक :
- दि. २४ जुलै ते २६ जुलै नवीन नोंदणी, अर्जदुरुस्ती व पसंतीक्रम नोंदविणे.
- दि. २७ जुलै – अलॉटमेंट प्रोसेस
- दि. २८ जुलै – महाविद्यालय वाटप प्रक्रिया.
- दि. २८ ते २९ जुलै – महाविद्यालय प्रवेश निश्चित करणे किंवा रद्द करणे.
- दि. २९ ते ३० जुलै – कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्रशासकीय कामकाजासाठी राखीव.
- दि. ३१ जुलै – पुढील फेरीसाठी रिक्त जागांचा तपशील जाहीर.






