विरार : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या एक दिवस आधी विरारमध्ये तुफान राडा झाला. विरारमधील एका हॉटेलमध्ये भाजपचे केंद्रीय नेते विनोद तावडे हे हॉटेलमध्ये पैसे वाटत असल्याचा आरोप करत बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी धडक दिली. या गोंधळात बविआचे विद्यमान आमदार क्षितीज ठाकूर देखील दाखल झाले. त्यामुळे वातावरण अधिकच तणावपूर्ण झाले. विनोद तावडे हे पैसे वाटण्यासाठी येत असल्याची माहिती भाजप नेत्यानेच दिली असल्याचा गौप्यस्फोट बहुजन विकास आघाडीचे प्रमुख हितेंद्र ठाकूर यांनी केला. विरारमधील हॉटेल विवांतमध्ये भाजपचे नेते विनोद तावडे, भाजप उमेदवार राजन नाईक यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. त्याच वेळी बहुजन विकास आघाडीचे विद्यमान आमदार क्षितीज ठाकूर हे आपल्या कार्यकर्त्यांसह उपस्थित झाले. त्यानंतर एकच गोंधळ उडाला. यावेळी बविआच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत तावडेंना घेराव घातला आणि जाब विचारण्यास सुरुवात झाली.
बविआचे प्रमुख, आमदार हितेंद्र ठाकूर यांनी मोठा गौप्यस्फोट केला. हितेंद्र ठाकूर यांनी सांगितले की, विनोद तावडे हे आज पैसे वाटण्यासाठी येत असल्याची माहिती मला मिळाली होती. ही माहिती मला भाजप नेत्याने दिली होती. त्यानंतर आम्ही आज त्या ठिकाणी दाखल झालो, असे ठाकूर यांनी सांगितले. विरारच्या विवांत हॉटेलमध्ये भाजपचे केंद्रीय सरचिटणीस विनोद तावडे आले होते. याबातची माहिती नालासोपारा विधानसभेचे उमेदवार क्षितीज ठाकूर यांना मिळताच त्यांनी कार्यकर्त्यांसह हॉटेल गाठले. यावेळी एका कार्यकर्त्यांने घटनास्थळावरून बॅग ताब्यात घेऊन ती तपासली त्यामध्ये पैसै भरलेले लिफाफे सापडले होते. त्यानंतर बविआच्या कार्यकर्त्यांनी हे लिफाफे उघडून पैसे दाखवले.