मुंबई : महसुल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) मुंबई विमानतळावर केलेल्या कारवाईत साडेसात किलो सोन्याच्या तस्करीप्रकरणी सहा जणांना अटक केली. जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत साडेचार कोटी रुपये असून आरोपींमध्ये विमान कंपनीच्या एका कर्मचाऱ्याचाही समावेश आहे. दुबई येथून आलेल्या प्रवाशाकडे मोठ्याप्रमाणात सोने असून त्याला विमान कंपनीचा कर्मचारी तस्करीत मदत करणार असल्याची माहिती डीआरआयच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे विमान कंपनीत सुरक्षा विभागात काम करणाऱ्या उमर शेख याची तपासणी केली असता त्याच्या बुटांमध्ये १७०० ग्रॅम सोने सापडले. चौकशी केली असता ते एका प्रवाशाने आसनाखाली लपवले होते. ते विमानतळाबाहेर काढण्यास शेखला सांगण्यात आले होते. त्या माहितीच्या आधारे त्या आसनावर बसलेला प्रवासी जमीर तांबे असल्याेच निष्पन्न झाले. त्याला डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे.
शेखच्या चौकशीतून यासीर डफेदारचे नाव उघड असून तो शेखच्या संपर्कात होता. सोने विमानातून बाहेर काढण्यासाठी शेखला ५० हजार रुपये मिळणार होते. त्यानंतर त्यालाही ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी फुकेटवरून आलेल्या आणखी एक प्रवासी मोहित लोटवानी याच्याकडूनही सोने स्वीकारण्यास शेखला सांगण्यात आले होते. त्या प्रवाशाने आणलेले १७०० ग्रॅम सोनेही डीआरआयने जप्त केले. आरोपींना सोने वितळवण्यास मदत करणाऱ्या अमर लाल व किशोरकुमार लाल या दोन पिता-पुत्रांनाही डीआरआयने अटक केली. उर्वरीत सोने डीआरआयने त्यांच्याकडून जप्त केले. या प्रकरणी एकूण साडेसात किलो सोने जप्त करण्यात आले असून त्याची किंमत साडेचार लाख रुपये आहे. याशिवाय याप्रकरणी साडेतीन लाख रुपयेही जप्त करण्यात आले आहेत.