डोंबिवली : कल्याण, डोंबिवली शहराच्या विविध भागात महिला, पुरूष पादचाऱ्यांना लक्ष्य करून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र, सोनसाखळी असा ऐवज हिसकावून पळून जाणाऱ्या आंबिवली, शहाड येथील दोन सराईत चोरट्यांना मानपाडा पोलिसांनी अटक केली. या चोरट्यांकडून आठ लाख ६८ हजाराचा ऐवज जप्त केला आहे. यामध्ये १५१ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि एक पल्सर दुचाकी वाहनाचा समावेश आहे. वारीस मिराज खान (२४, रा. अटाळी, कल्याण), मोहम्मद जाफर कुरेशी (३०, रा. शहाड) अशी आरोपींची नावे आहेत. साहाय्यक आयुक्त सुनील कुराडे यांनी सांगितले, गेल्या आठवड्यात मानपाडा रस्ता भागात राहणारे एक शिक्षक रवी गवळी सकाळच्या वेळेत डी मार्ट भागातील रस्त्यावर फिरत होते. पायी जात असताना अचानक त्यांच्या पाठीमागून एक दुचाकी आली. त्या दुचाकीच्या पाठीमागे बसलेल्या इसमाने गवळी यांच्या गळ्यातील १८ ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी हिसकावून दुचाकीसह पळ काढला. मानपाडा पोलीस ठाण्यात गवळी यांनी तक्रार केली होती.