मुंबई : मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी यासाठी प्रशासनाकडून अनेक प्रयत्न केले जातात. प्रशासनाकडून मुंबईत मेट्रो, उड्डाणपुल यांचे जाळे उभारण्यात येत आहेत. मुंबई महापालिकेचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेल्या कोस्टल रोड आता लिंक रोडला जोडण्यात येत आहे. या प्रकल्पामुळं कोस्टल रोडवरुन थेट वरळी सी-लिंकवर प्रवास करता येणार आहे. त्यामुलं वाहतुककोंडीही कमी होणार आहे. या पुलाचे काम वेगाने सुरू असून येत्या काही दिवसांत गर्डर बसवण्यात येणार आहे. वरळी सी-लिंक जोडण्यासाठी पिलर ७ आणि ९ च्या मध्ये देशातील सर्वात मोठा आणि ३० बोइंग जेट वजनाइतका दोन हजार टनांचा बो आर्क गर्डर २ ते ३ दिवसांत बसवण्यात येणार आहे. कोस्टल रोड प्रकल्पातील हा सर्वांत आव्हानात्मक टप्पा आहे. बो आर्क गर्डर हा संपूर्ण स्टील बनावटीचा असलेला हा गर्डर पुढील १०० वर्षे टिकेल इतका मजबूत आहे. येत्या १७ किंवा १८ एप्रिलदरम्यान हा गर्डर बसवण्यात येणार आहे. यावेळी अरबी समुद्रातील भरती आणि ओहोटीच्या वेळा पाहूनच काम करण्यात येणार आहे.
१३६ मीटर लांब असलेल्या गर्डरमुळं कोस्टल रोड आणि वांद्रे वरळी सी-लिंक यातील कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. तसंच दक्षिणेकडील चार बाजूच्या लेन खुल्या होणार आहेत. या गर्डरचे एकूण वजन दोन हजार टन इतके असून १३६ मीटर लांब आहे. पुलाच्या एकूण गर्डरपैकी चार गर्डर आधीच लाँच करण्यात आले आहेत. तर, दोन गर्डर एप्रिलमध्ये लाँच करण्याची शक्यता आहे. मरीन ड्राईव्ह ते वरळीपर्यंतचा कोस्टल रोडचा पहिला टप्पा सुरू करण्यात आला आहे. आता लवकरच प्रियदर्शनी पार्क ते वरळीदरम्यान कोस्टल रोड मेपर्यंत खुला करण्याचे पालिकेचे नियोजन आहे. त्यादृष्टीने वेगाने काम सुरू आहे. कोस्टल रोड आणि सी-लिंकदरम्यान तयार होणाऱ्या पुलाचे अंतर ८५० मीटर रुंद आणि २७० मीटर रुंद आहे. त्यामुळं वरळी येथे कोस्टल रोडला सी-लिंकची कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. सी-लिंक आणि कोस्टल रोड कनेक्ट झाल्यानंतर थेट दक्षिण मुंबईत येता येणार आहे. वांद्रे येथून दक्षिण मुंबईत येणाऱ्या वाहनांना सध्या सी-लिंक वरळीला जिथे संपतो तिथे वाहतुक कोंडीचा सामना करावा लागणार नाही. मे महिन्यापर्यंत पुलाची ही सर्व कामे संपून हा मार्ग सुरू करण्याचा प्रशासनाची तयारी आहे, अशी माहिती समोर येतेय.