पुणे : पुण्यासह नाशिक शहरात महिलांकडील दागिने हिसकावणाऱ्या चोरट्यांच्या टोळीला अटक करण्यात आली. वाघोली पोलिसांनी ही कारवाई केली. चोरट्यांकडून सोन्याचे दागिने, दुचाकी आणि मोबाइल संच असा एक लाख ८९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. प्रशांत संतविजय यादव (वय १९, रा. शिवाजीनगर, सातपूर. नाशिक), कुणाल विश्वनाथ साबळे (वय २१, रा. स्वामीनगर, सिडको, नाशिक), ताजीम सल्लाउद्दीन अन्सारी (वय २०, रा. अशोकनगर, सातपूर, नाशिक), संतोष संजोग भांगरे (वय १८, रा. सातपूर, नाशिक), मनोज उदय पाटील (वय ३१, रा. शिवाजीनगर, सातपूर, नाशिक) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
आरोपी यादव आणि साबळे यांनी वाघोली भागात एका महिलेचे दागिने हिसकावले होते. या गुन्ह्याचा वाघोली पोलिसांकडून तपास करण्यात येत होता. यादव आणि साबळे यांनी दौंड परिसरातून दुचाकी चोरून महिलेचे दागिने हिसकावून नेले होते. याबाबतची माहिती तपास पथकातील पोलीस कर्मचारी साईनाथ रोकडे, दीपक कोकरे यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तपास करून दोघांना ताब्यात घेतले. तपासात यादवने साथीदार अन्सारी याच्यासोबत पुणे शहरातील विमाननगर, कोरेगाव पार्क भागात दागिने हिसकाविण्याचे गुन्हे केल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी अन्सारीला ताब्यात घेतले.







