मुंबई : पावसाळ्यातील साथीच्या आजारांचा प्रतिबंध करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचाच भाग म्हणून मोठ्या प्रमाणात रुग्णांचा त्वरित शोध घेऊन त्यांचे विलगीकरण करत तत्काळ उपचार करण्यास प्राधान्य दिले जात आहे. त्यासाठी यंदा शहरात पावसाळी आजारांसाठी राखीव अशा तीन हजार रुग्णशय्यांची (बेड) व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर तापसदृश आजारांसाठी ‘फीव्हर ओपीडी’ची व्यवस्था करण्यात आली आहे. पावसाळी आजारांच्या प्रतिबंधासाठी सर्व यंत्रणांनी एकत्रित पद्धतीने प्रयत्न करावेत, असे निर्देश महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहे. विविध शासकीय, निम-शासकीय, यंत्रणांचा समावेश असलेल्या डास निर्मूलन समितीची आढावा बैठक गगराणी यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका मुख्यालयात पार पडली. यावेळी गगराणी यांनी विभागातील सहायक आयुक्तांनाही पावसाळाजन्य आजाराच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी मार्गदर्शन केले.
डेंग्यू, मलेरिया यासारख्या आजारांवर प्रतिबंधासाठी विविध यंत्रणांच्या साहाय्याने सामूहिक पद्धतीने योगदान गरजेचे आहे. पावसाळ्यातील आगामी तीन महिने हे आव्हानात्मक असणार आहेत. डासांची उत्पत्ती स्थाने शोधून वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न गरजेचे आहेत. अविरतपणे एकत्र सहभागातून पावसाळी आजारांना प्रतिबंध करण्यासाठी सर्व यंत्रणांनी योगदान देण्याचे आवाहन महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी यावेळी केले. दरम्यान, डेंग्यू आणि मलेरियाची मोफत चाचणी केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. तापसदृश उपचारांसाठी महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांमध्ये २४ तास बाह्य रुग्णसेेवा उपलब्ध आहे. राजे एडवर्ड स्मारक (केईएम) रुग्णालय दुपारी ४ ते रात्री १०, डॉ. रू.न. कूपर दुपारी २ ते रात्री ८, लोकमान्य टिळक सर्वसाधारण (शीव) रुग्णालय २४ तास, बा. य. ल नायर रुग्णालय दुपारी ४ ते सायंकाळी ६ या वेळेत, तर उपनगरीय रुग्णालयात सायंकाळच्या वेळेत बाह्य रुग्णसेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
अशी आहे बेडची व्यवस्था-
१) राजे एडवर्ड स्मारक रुग्णालय (केईएम)- ३०
२) लोकमान्य टिळक सर्वसाधारण रुग्णालय- १६२
३) बा. य. ल. नायर रुग्णालय- ४११
४) कूपर रुग्णालय -१०७
४) उपनगरीय सर्वसाधारण रुग्णालय- ९६१