मीरा-भाईंदर : अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या आंतरराज्य टोळी मीरा-भाईंदर गुन्हे शाखा १ च्या जाळ्यात अडकलीय. या टोळीकडून ३२७ करोड ६९ लाख रुपयाचा ड्रग्ज जप्त केलंय. या कारवाईमध्ये महाराष्ट्रातून ३, तेलंगणामधून ३, उत्तर प्रदेशमधून ८ आणि गुजरातमधून १ अशा एकूण १५ आरोपींना अटक करण्यात आलीय. त्यासोबतच तीन पिस्तल १ रिव्हॉलवर ३३ जिवंत काडतुसेदेखील पोलिसांनी जप्त केली आहेत. ही टोळी संपूर्ण देशभरात कार्यरत होती, यामधील पैशाची उलाढाल करणारा मुख्य आरोपी सलीम डोळा हा सध्या फरार असून अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित असल्याचा दावा पोलिसांनी केलाय. त्याचा शोध पोलिसांकडून केला जातोय. या एम. डी. ड्रग्स तस्करीमध्ये सलीम डोळा हा प्रमुख असून काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी अटक केली होती. देशभरात सलीम डोळाच्या नावावर अनेक गुन्हे दाखल आहेत. डोळा हा सर्वे कारोबार दुबईमधून चालवत असल्याचं तपासात निष्पन्न झाले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या काळात मिरा भाईंदर गुन्हे शाखा एकच्या टीमने नाकाबंदी वेळी १५ मे रोजी काशीमिरा भागातून शोएब मेमन व निकोलेस हे दोघे एम.डी. ड्रग्जची विक्री करण्यासाठी आलेल्या या दोघांना ताब्यात घेतले. यावेळी दोन कोटी रुपयांचे एम.डी.ड्रग्स जप्त केले. या दोघांनी दिलेल्या माहितीनुसार हे ड्रग्स तेलंगणामधून आणले असे समजताच पोलिसांचे एक पथक तेलंगणा येथे रवाना झालं. तेलांगणामधील विकाराबाद जिल्ह्यातून नासिर उर्फ बाबा शेख, दयानंद उर्फ दया माणिक यांना ताब्यात घेत २५ कोटी रुपयांचे एम. डी. ड्रग्स आणि कारखाना सील करण्यात आलंय. यानंतर या प्रकरणात मोठी टोळी कार्यकरत असल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर गुन्हे शाखेच्या टीमने सखोल तपास करत महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, हैदराबाद मधून एकूण १५ जणांना ताब्यात घेत ३२७ करोड ६९ लाख रुपयाचा एम.डी. (मॅफेड्रॉन) ड्रग्स जप्त केलं. यांचा मुख्य सूत्रधार सलीम डोळा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित असून पोलीस त्यांचा तपास करत आहे. यामध्ये अधिक ५ ते ६ आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिस आयुक्त मधुकर पांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.