पुणे : काळ्या पैसा व्यवहारात दिल्ली पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार असल्याची भीती दाखवून सायबर चोरट्यांनी तरुणाची २३ लाख ५५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध चंदननगर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत एका तरुणाने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सायबर चोरट्यांनी तक्रारदार तरुणाच्या मोबाइल क्रमांकावर २१ सप्टेंबर रोजी संपर्क साधला हाेता. तुमच्याविरुद्ध दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बँक खात्याचा काळा पैसा व्यवहारात वापर झाला असून, या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी तातडीने पैसे जमा करावे लागतील, अशी भीती चोरट्यांनी तरुणाला दाखविली. त्यानंतर तरुणाला बँक खात्यात तातडीने पैसे जमा करण्यास सांगितले. त्यानंतर तरुणाने चोरट्यांनी दिलेल्या वेगवेगळ्या बँक खात्यात वेळोवेळी पैसे जमा केले. २३ लाख ५५ हजार रुपये जमा केल्यानंतर तरुणाच्या मोबाइलवर चोरट्यांनी पुन्हा संपर्क साधला. त्याला आणखी रक्कम जमा करण्यास सांगितले. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर तरुणाने पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल माने तपास करत आहेत.