पुणे : खरं तर दिवसेंदिवस सायबर क्राईमच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. पुण्यातील एका सेवानिवृत्त महिला अधिकाऱ्याची पावणे तीन कोटींची फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. आरोपीने गुंतवणुकीवर चांगल्या परताव्याचं आमिष दाखवून या महिलेला गंडा घातला आहे. आपण या घटनेबद्दल सविस्तर जाणून घेऊ या. पुण्यातील एका सेवानिवृत्त महिला अधिकाऱ्याची पावणे तीन कोटींची फसवणूक झाली आहे. या प्रकरणी ज्येष्ठ महिलेने (वय ७०) सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या संपूर्ण प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसंच यासंबंधी त्यांनी तपास देखील सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला पुण्यातील हनुमाननगर परिसरात राहते. या महिला अधिकाऱ्याने सेवानिवृत्तीनंतर मिळालेली आणि गुंतवणुकीतील रक्कम बँकेत ठेवली होती. एके दिवशी सायबर चोरट्यांनी महिलेच्या मोबाईलवर शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असा मेसेज केला. त्यानंतर आरोपींनी पीडित महिलेचा विश्वास संपादन करून त्यांच्या बँक खात्याचा क्रमांक दिला. चोरट्यांनी सुरुवातीला महिलेने गुंतवणूक केलेल्या रकमेवर परतावा दिला. त्यामुळे या महिलेचा त्यांच्यावर विश्वास बसला.
आरोपींवर विश्वास बसल्यामुळे महिलेने आणखी गुंतवणूक करण्याचं ठरवलं होतं. पीडित महिलेनं पुढील काही महिन्यांत वेगवेगळ्या बँक खात्यात दोन कोटी ८४ लाख ५९ हजार रुपयांची गुंतवणूक केली. परंतु महिलेला त्याचा परतावा मिळाला नाही. यानंतर फसवणूक झाल्याचं पीडित महिलेच्या लक्षात आलं. त्यानंतर पीडित महिलेनं पोलीस ठाण्यात धाव घेतली अन् अज्ञात व्यक्तीविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सध्या आरोपींचा शोध घेत आहेत. गुंतवणूकीवर चांगल्या परताव्याचं आमिष दाखवून फसवणुकीच्या घटना अलीकडे वाढल्या आहेत. त्यामुळे गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे, अन्यथा मोठं नुकसान होऊ शकतं. पुण्यात या महिलेला सायबर चोरट्यांनी कोट्यवधींना गंडा घातला आहे.