नवी मुंबई : फेसबुकवरून एका अनोळखी व्यक्तीसोबत मैत्री करणे ऐरोली भागात राहणाऱ्या एका ३८ वर्षीय महिलेला महागात पडले आहे. हा अनोळखी मित्र आणि त्याच्या साथीदारांनी या महिलेला ३२ लाख ४५ हजार रुपये पाठविल्याची खोटी पावती पाठवून दिली. तसेच, हे पैसे घेण्याच्या बहाण्याने तिला वेगवेगळ्या बँक खात्यामध्ये तब्बल ५४ लाख रुपये पाठविण्यास भाग पाडले. नवी मुंबई पोलिसांच्या सायबर पोलिसांनी या प्रकरणी फसवणुकीसह आयटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार महिला ऐरोलीमध्ये राहण्यास असून ती आयटी कंपनीमध्ये कामाला आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये या महिलेच्या फेसबुकवर लुकास इथन नावाच्या व्यक्तीने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून तिच्यासोबत मैत्री केली होती. त्यावेळी लुकास याने तो युकेमध्ये राहात असल्याचे व तेथील एका मोठ्या कंपनीमध्ये मॅनेजर असल्याचे सांगितले होते. सुरुवातीला या दोघांमध्ये चॅटिंगने व त्यानंतर व्हॉट्सऍपवरून बोलणे सुरू झाले. या महिलेने परदेशात नोकरी करण्याची इच्छा व्यक्त केल्याने लुकास याने युकेमध्ये तिला आयटी कंपनीत नोकरी मिळवून देण्यास मदत करण्याचे आश्वासन दिले होते.
१ सप्टेंबर रोजी लुकान याने इंडोनेशिया येथे आल्याचा मेसेज या महिलेला पाठवून त्याचे फॉरेन करन्सीचे कार्ड बंद झाल्याचे व ते पुन्हा सुरू होण्यास एक आठवडा लागणार असल्याचे सांगितले. तसेच, रोजच्या गरजांसाठी व प्रोजेक्ट वर्कसाठी पाच हजार युएस डॉलरची तिच्याकडे मागणी केली. या महिलेने त्याला साडेपाच लाख पाठवून दिले. काही दिवसांनंतर लुकास याने या महिलेच्या खात्यात ३२ लाख ४५ हजार रुपये पाठविल्याची पावती व्हॉट्सॲप नंबरवरून पाठवून दिली. तसेच, अडचणीच्या काळात तिने मदत केल्याने तिला जास्त रक्कम पाठविल्याचेही त्याने सांगितले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी दिल्ली येथील रॉयल बँक ऑफ स्कॉटलँड या बँकेतून बोलत असल्याचे भासवून एका महिलेने ऐरोलीतील या महिलेशी संपर्क साधला. तसेच, तिच्या नावाने ३२ लाख ४५ हजार रुपये त्यांच्या बँकेत आल्याचे सांगून या पैशांवर तीन लाख ७५ हजार रुपये कर भरल्यानंतर ही रक्कम तिच्या खात्यात जमा होईल, असे सांगितले. त्यामुळे या महिलेने ही रक्कम पाठवून दिली. त्यानंतर वेगवेगळ्या कारणांनी तिला पैसे भरण्यास भाग पाडले. अशा प्रकारे या महिलेने वेगवेगळ्या बँक खात्यामध्ये गुगल पे तसेच एनइएफटीद्वारे तब्बल ४८ लाख ५५ हजार रुपये पाठवून दिले. गेल्या आठवड्यात या महिलेने मुंबई फोर्ट येथील रॉयल बँक स्कॉटलँड येथील शाखेत जाऊन ३२ लाख ४५ हजार रुपयांची फॉरेन रेमिटन्सची पावती दाखवून चौकशी केली. यावेळी ही पावती खोटी असल्याचे तसेच, त्यांच्या बँकेची दिल्ली येथे शाखा नसल्याचे तिला सांगण्यात आले. अखेर या महिलेने नवी मुंबई पोलिसांच्या सायबर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.