पुणे : सदर्न कमांडच्या इंटेलिजन्स युनिट आणि गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने शुक्रवार पेठ परिसरात छापा टाकून सव्वादोन लाख रुपये किमतीचे मेफेड्रॉन जप्त केले. या प्रकरणी चार जणांना ताब्यात घेतले असून, एकजण फरार झाला आहे. याबाबत अमली पदार्थ विरोधी पथकातील पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर लक्ष्मण घोरपडे यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून खडक पोलिस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. रोनित बिपिन खाडे (वय १९, रा. सिंहगड रस्ता, हिंगणे), चैतन्य शिवाजी सावले (वय २७, रा. किरकटवाडी), सार्थ वीरेंद्र खरे (वय १९, रा. सिंहगड रस्ता), विशाल कमलेश मेहता (वय १९, रा. सिंहगड रस्ता) आणि अनुश जोतिबा माने (रा. घोरपडे पेठ) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.
शुक्रवार पेठ परिसरात काहीजण मेफेड्रॉन विक्रीसाठी येणार असल्याची माहिती सदर्न कमांडच्या इंटेलिजन्स युनिटला मिळाली. या युनिटने पोलिसांच्या मदतीने छापा टाकून चार जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सुमारे सव्वादोन लाख रुपये किमतीचे ११ ग्रॅम मेफेड्रॉन आणि चार मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. अमली पदार्थ विरोधी पथकाच्या पोलिस निरीक्षक अश्विनी सातपुते, पोलिस हवालदार प्रवीण उतेकर, पांडुरंग पवार, मारुती पारधी, मनोज साळुंके, विशाल दळवी, विशाल शिंदे, योगेश मोहिते यांच्या पथकाने ही कारवाई केली.