मुंबई : शासनाच्या मुंबई वाकोला येथील न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेत एक गंभीर प्रकार समोर आला आहे. बनावट शैक्षणिक कागदपत्रे वापरून तरुणाने सरकारी नोकरी मिळवण्याचा प्रकरण उघडकीस आले आहे. याप्रकरणी आता विजयसिंग नटवरसिंग सोळंकी मुंबईच्या वाकोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, शासकीय न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोग शाळेतील लिपीक टंकलेखक (गट क) विजयसिंग नटवरसिंग सोळंकी परवानगी न घेता मागील नऊ महिन्यापासून गैरहजर आहे. याबाबत उप संचालक, प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा, नाशिक यांनी त्यांना कर्तव्यावर हजर होण्याकरिता नोटिस जारी केले. मात्र तरीदेखील तो कामावर हजर न झाल्याने पोलिसांना कळवून चौकशी केली असता विजयसिंग सोळंकी यास भादवि कलम ३०२ या गुन्हया प्रकरणी गुजरात राजगड पोलिसांनी अटक केल्याची माहिती मिळाली.
यानंतर उपसंचालक प्रादेशिक न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा नाशिक यांनी विजयसिंह सोळंकी यांनी नटवर सिंग याने नोकरीसाठी जमा केलेले शाळा सोडल्याचा दाखला आणि इयत्ता नववीचे गुणपत्रक या संदर्भात पडताळणी केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर विजयसिंह नटवर सिंग सोळंकी व विजयसिंह किरीटसिंग सोळंकी या दोन्ही व्यक्ती एकच असल्याचे समोर आले. तसेच विजयसिंग नटवरसिंग सोळंकी याने सादर केलेला शाळा सोडल्याच्या दाखला अर्जुनसिंग कांतीभाई या व्यक्तीचे असल्याचे समजले. शिवाय चारित्र्य पडताळणी बाबत केलेल्या पत्र व्यवहारा संदर्भात प्राप्त अहवालावर गुजरात पोलीस अधीक्षकाची बनावट सही केल्याचे देखील निष्पन्न झाले. या प्रकरणात २०/१०/२००४ रोजी ते आज पर्यंत शासकीय नोकरी करून न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा, कलीना, सांताक्रूझ पूर्व, मुंबई यांची तसेच महाराष्ट्र शासनाची फसवणूक केल्याने विजयसिंग नटवरसिंग सोळंकी उर्फ विजयसिंग किरीटसिंग सोळंकी विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.