मुंबई : मुंबई राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघातील निकालाची आकडेवारी समोर येत असून भाजपने पहिल्याच फेरीत मोठी आघाडी घेतली आहे. २८८ मतदारसंघाच्या सुरुवातीच्या कलानूसार एकनाथ शिंदेंची शिवसेना ५५ जागांवर आघाडीवर आहे. तर उद्धव ठाकरेंची शिवसेना सध्या १९ जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत एकनाथ शिंदेंना उद्धव ठाकरेंपेक्षा मोठं यश मिळालं आहे. ठाकरेंच्या बाजूने सहानभुती आहे, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. परंतु मतदारांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला साथ दिल्याचं सुरुवातीच्या आकडेवारीवरुन दिसून येत आहे. याचदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. शिंदे म्हणाले की, सर्वप्रथम महाराष्ट्रातल्या तमाम मतदारांचं मनापासून अभिनंदन करतो. त्यांना मनापासून धन्यवाद देतो. या निवडणुकीत महायुतीला अगदी थंम्पिंग मेजोरिटी अशा प्रकारचा विजय मिळालेला आहे. त्याबद्दल मी अभिनंदन करतो आणि माझ्या लाडक्या बहिणींचंही अभिनंदन करतो. लाडक्या बहिणींनी मतदान केले. लाडक्या भावांनी, शेतकऱ्यांनी मतदान केलं. ज्येष्ठ आणि समाजातील प्रत्येक घटकाने महायुतीला भरभरून मतदान दिलं.
गेली अडीच वर्षे सरकारने जी कामे केली, त्या कामाची पोचपावती या निवडणुकीत जनतेने दिली. त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानतो. पूर्णपणे जे काम केलं अडीच वर्षांत त्याची नोंद आणि कामाची पोचपावती आम्हाला दिली. पुढच्या कार्यकाळात आणखी जबाबदारी वाढली आहे. जनतेला त्रिवार वंदन करतो. माझ्या कार्यकर्याना धन्यवाद देतो. मनापासून सर्वांनी काम केलं. म्हणूनच हा विजय मिळाला. माझ्या मतदारसंघातील मतदारांचे धन्यवाद देतो. खूप मोठ्या फरकाने मला विजयी करण्याचे प्रयत्न केले. सर्वांचे मनापासून अभिनंदन. असे ते म्हणाले. राज्यातील सर्व जागांचे कल हाती आले असून, पुन्हा एकदा महायुतीचं सरकार स्थापन होणार हे आता स्पष्ट झालं आहे. लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करणाऱ्या महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीत चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. मात्र महायुतीने बहुमत मिळवत मोठा झटका दिला आहे.