मुंबई : मी यंदा पुन्हा जिंकणार आणि गिनीज बुकात जाणार असा दावा करणाऱ्या भाजपच्या कालिदास कोळंबकर यांनी दमदार विजय मिळवला आहे. वडाळ्यात मतमोजणीच्या एकूण १६ फेऱ्या होणार आहेत. कोळंबकर यांच्यासमोर शिवसेना उबाठाच्या उमेदवार श्रद्धा जाधव यांचं आव्हान होतं. त्या मुंबईच्या महापौर राहिल्या आहेत. कोळंबकर यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांच्या विजयामुळे मोठा विक्रम रचला गेला आहे. विधानसभा निवडणुकीत सलग नऊवेळा विजय मिळवण्याची संधी कोळंबकर यांच्याकडे आहे. शिवसेना, काँग्रेस, भाजप असा राजकीय प्रवास करणाऱ्या कोळंबकर यांनी १९९० पासून सातत्यानं निवडणूक जिंकली आहे. त्यांनी सलग आठ निवडणुका जिंकलेल्या आहेत. विशेष म्हणजे कोळंबकर यांनी प्रचारादरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ‘बटेंगे तो कटेंगे’ घोषणेला त्यांनी स्पष्ट शब्दांत विरोध केला होता. मतदारसंघातील मुस्लिम मतदार आपल्या पाठिशी राहतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सलग नवव्यांदा निवडणूक जिंकून माझं नाव गिनीज बुकमध्ये जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. वडाळा मतदारसंघात मराठी मतदारांचं प्रमाण लक्षणीय आहे. याशिवाय मुस्लिम, पारशी, दलित मतदारांची संख्याही बऱ्यापैकी आहे. कोळंबकर यांनी पहिल्यांदा शिवसेनेतून विधानसभेची निवडणूक लढवली. १९९० मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. तेव्हापासून ते अपराजित आहेत. तेव्हा ते नायगाव मतदारसंघातून विजयी झाले होते. २००९ मध्ये मतदारसंघाची पुनर्रचना झाली. तेव्हापासून कोळंबकर वडाळ्यातून विजयी होत आले आहेत. दिवंगत आमदार गणपतराव देशमुख सोलापूरच्या सांगोल्यातून १० वेळा विजयी झाले होते. पण त्यांना हे विजय सलग मिळवता आलेले नाहीत. पण मी सलग आठवेळा जिंकलो आहे. आता मी नवव्यांदा विजयी होईन, अशी खात्री कोळंबकर यांनी व्यक्त केली होती. शिवसेनेतून राजकीय प्रवास सुरु करणाऱ्या कोळंबकर यांनी २००५ मध्ये नारायण राणेंसोबत सेना सोडली. त्यानंतर ते काँग्रेसमध्ये गेले. २०१९ मध्ये ते भाजपकडून निवडून आले.